सावद्यात पावणेचार लाखांचा गुटखा जप्त : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सावदा : शहरातील लखन ट्रेडर्स स्टेटसवर अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक धाड टाकत तब्बल तीन लाख 67 हजारांचा गुटखा जप्त केल्यानंतर चोरून गुटखा विक्री करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी आर.एन.भरकड व के.ये.साळुंखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी ही कारवाई केली. कारवाईनंतर अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री सुरू असता स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली नाही? असा प्रश्न देखील यानिमित्ताने निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने कारवाईत सातत्य राखावे, अशी अपेक्षा सुज्ञ जनता व्यक्त करीत आहे.