सावधान, दमट वातावरणामुळे डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनियाचा धोका

0

पुणे : अधून-मधून येणारा पाऊस व ऊन यामुळे हवेत दमटपणा निर्माण झाला आहे. त्यामुळेच सध्या साथीचे रोग पसरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने साथीचे रोग वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या तपासणीमध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, थंडीताप यांसारख्या आजारांचे सर्वाधिक रुग्ण ऑगस्टमध्ये आढळून आले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच जाताना दिसत आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातही साथीच्या रोगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने हा धोका वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

स्वाइन फ्लूचे 74 रुग्ण

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ऑगस्टची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंतच्या साथीच्या रोगांचा उच्चांक आढळून आला आहे. सध्या स्वाइन फ्लूची साथ जोरात पसरत असून 4 ऑगस्ट रोजी आणखी 6 रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 74 रुग्ण आढळले असून त्यातील 60 रुग्ण हे एकट्या ऑगस्टमध्ये आढळले आहेत. तर ऑगस्टमध्येच तीन महिलांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

ऑगस्टमध्ये रुग्ण वाढले

डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या जानेवारीपासून 1 हजार 471 आहे. त्यापैकी 589 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या चार दिवसांत डेंग्यूचे 63 संशयित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूने रुग्ण दगावल्याचे पालिकेने जाहीर केलेले नाही, मात्र दोन संशयितांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. चिकनगुनिया रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली, तरीही त्याची रुग्णसंख्या सध्या वेगाने वाढत आहे. चिकुनगुनियाचे सध्या 152 संशयित रुग्ण आढळले असून त्यातील 70 रुग्ण हे ऑगस्टमधील आहेत. त्याचबरोबर थंडी ताप, विषमज्वर असे आजारांचे प्रमाणही ऑगस्टमध्ये वाढल्याचे दिसत आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

साथीचे रोग पसरणे हे वातावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी भरपूर पिणे, स्वच्छता, व्हिटॅमिन सीयुक्त आहार घेणे, बाहेर पडताना रुमाल बांधणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, स्वच्छ पाणी साठू न देणे आवश्यक आहे.

 डॉ. अंजली साबणे,
सहायक आरोग्य अधिकारी, मनपा