पुणे (माधुरी सरवणकर) : स्वाइन फ्लु, डेंग्यु या आजारांनी आधीच त्रस्त असलेल्या पुणेकरांच्या नशिबी आता आणखी एक नवीन विषाणूज्य आजार आला आहे. जॅपनिज एन्सेफ्लायटीज (जेई) असे या आजाराचे नाव असून, तीव्र ताप येणे, झटके येणे आदी या आजाराची लक्षणे आहेत. कोंढव्यातील एका दहा महिन्याच्या बाळाला या आजाराचे निदान झाले असून, तो आजार क्युलेक्स विष्णोई या प्रजातीचा डास चावल्यानंतर होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या आजाराची साथ आटोक्यात आणणे व वेळीच या डासाचा नायनाट करणे असे संकट पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर ठाकलेले आहे. पुणे शहरात सद्या एडिस इजिप्ती या डासांपासून होणारा डेंग्यु व मलेरिया या तापाने डोके वर काढले असून, आता जेई या आजारामुळे नवेच संकट पुणेकरांवर ओढावलेले आहे.
साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती, डासांमार्फत रोगप्रसार!
जॅपनिज एन्सेफ्लायटीज हा विषाणूजन्य आजार क्युलेक्स विष्णोई हा डास चावल्यामुळे होतो. या डासांची उत्पत्ती भातशेतीच्या पाण्यात तसेच पान वनस्पती असलेल्या स्वच्छ पाण्याच्या डबक्यात होते. हे डास घराबाहेर राहून रात्रीच्या वेळेस रक्त शोषण्यासाठी माणसांना तसेच प्राण्यांना चावण्यासाठी गोठ्यात येतो. मुख्यतः हा आजार प्राणीजन्य असल्यामुळे या रोगाच्या विषाणूंची वाढ डुक्कर व पक्षी यांमध्ये प्रामुख्याने होतो. हे डास डुक्कर व पक्षी यांना चावले असता नऊ ते बारा दिवसांत हे प्राणी या आजाराने व्याधीग्रस्त होतात. तसेच, हेच डास निरोगी माणसास चावल्यास त्यालाही या आजाराची बाधा होते. शिवाय, बाधीत डुक्कर, पक्षी यांना इतर डास चावले व तेच डास मनुष्यासही चावले तरी संबंधित व्यक्तीस या आजाराची बाधा होते. या रोगाचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीस होत नाही. या विषाणूजन्य आजारामुळे रूग्णाला अर्धांगवायू, कायमस्वरूपीचे अपंगत्व येण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे बालकांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास 50 टक्के मृत्यू ओढावण्याची शक्यता असते. या आजारावर अद्यापही औषधांचे संशोधन झाले नसल्याने काही उपचार योजायचे झाल्यास केवळ लक्षणे पाहून उपचार करावे लागतात. मागीलवर्षी पुण्यात या आजाराचे दोन रूग्ण अढळून आले होते.
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनी काळजी घ्यावी!
पुण्यातील कोंढावा येथील एका दहा महिन्याच्या शिशुला हा आजार झाल्याचे निदान झाले असून, त्याच्यावर कोंढवा भागातील इनामदार रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच संपूर्ण शहरात क्युलेक्स विष्णोई डासाची उत्पत्तीस्थळे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. हा डास चावल्यास आठ ते दहा दिवसांनतर जॅपनिज एन्सेफ्लायटीज या विषाणूचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. व आजार गंभीर स्वरूप धारण करतो. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडकरांनी पावसाळ्यात स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. क्युलेक्स विष्णोई या डासापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसा व रात्री संपूर्ण शरीराला डास न चावणारी क्रीम लावावीत, तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करण्याचा सल्ला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
क्युलेक्स विष्णोई हा डास प्रामुख्याने जलपर्णी असलेल्या पाण्यात, डबक्यात आढळतो. याच भागात या डासाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. मुख्यत्वे हा आजार लहान मुलांना लवकर होतो. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही पालिकास्तरावर सार्वजनिक ठिकाणी अळीनाशक कार्यक्रम चालू केले आहेत. त्याचप्रमाणे फवारणीदेखील करण्यास सुरुवात केली आहे.
डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी
ही आहेत आजाराची लक्षणे –
1. तीव्र स्वरूपाचा ताप येणे
2. अंगदुखी, डोकेदुखी
3. वागणुकीत लक्षणीय बदल होणे
4. झटके येणे, बेशुद्ध होणे