सावरकर भवनाच्या जागेवर मेट्रो स्टेशन करावे

0

नगरसेवक धनावडे, ओसवाल यांची मागणी

पुणे – मेट्रो रेल्वेसाठी मुठा नदीपात्राशेजारी सावरकर भवन येथे मेट्रो स्टेशन करावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनावडे आणि बाळा ओसवाल यांनी केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्याजागी व्यापारी संकुल आणि मेट्रो स्टेशन उभारण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे. पु.ल.देशपांडे यांच्या देखरेखीखाली उभे राहिलेले हे महापालिकेचे रंगमंदिर पाडण्यास महाराष्ट्रातील कलाप्रेमींचा तीव्र विरोध आहे. शिवसेनाही आता रंगमंदिर पाडण्याच्या विरोधात उभी राहिली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनावडे आणि बाळा ओसवाल यांनी जाहीरपणे विरोधाची भूमिका घेतली आहे.

‘जनशक्ती’शी बोलताना धनावडे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर आणि सावरकर भवन या दोन्ही इमारती नजीकच आहेत. बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्रातील नाट्यप्रेमी मंडळींचे प्रेरणास्थान आहे. अनेक कलाकार या रंगमंदिराच्या माध्यमातून पुढे आले आहेत. नाट्यप्रेमी महाराष्ट्राची ही शान आहे. ते पाडण्यास आमचा विरोधच आहे. त्याऐवजी सावरकर भवन पाडावे कारण त्या भवनामध्ये एक, दोन व्यावसायिक सोडले तर, महापालिकेचीच कार्यालये आहेत. ती कार्यालये पालिकेच्या मुख्य भवनात हलविता येऊ शकतात त्यामुळे सावरकर भवन पाडून तेथे मेट्रोचे स्टेशन उभारावे आणि त्याला सावरकरांचे नांव द्यावे अशी आमची मागणी आहे.

मेट्रोच्या नावांने बालगंधर्व रंगमंदिराचा बळी जावू देणार नाही. शिवसेना विरोधच करत राहील असा इशारा नगरसेवक बाळा ओसवाल यांनी दिला. मेट्रोसाठी तसेच व्यापारी संकुलासाठी अन्य जागा शोधण्याऐवजी बालगंधर्व रंगमंदिराचा विचार का करण्यात आला? असा सवाल ओसवाल यांनी केला.