पुणे । चांगला वक्ता व्हायचं असेल तर खूप वाचलं पाहिजे, दुसर्याची भाषणे ऐकली पाहिजे, भाषणाला जाण्याआधी चांगली तयारी केली पाहिजे. इंटरनेटवरून माहिती न घेता आपल्याकडे चांगली ग्रंथसंपदा आहे. त्यातून नेमके व अचूक शोधून ते आपल्या भाषेत मांडत आपले वक्तृत्व साधना जोपासा, तरच तुम्ही चांगले वक्ते होऊ शकतो, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी काढले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वा. सावरकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या स्पर्धेत आयएलएस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. तर याच महाविद्यालयाच्या महेश गडदे याने वैयक्तिक गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौरात राजकीय व व्यावसायिक करार केले. त्यानंतर या दौर्यामुळे जगातून उमटणार्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर भारत-इस्रायल मैत्री पर्वामुळे भारत-अरब राष्ट्रे संबंध बिघडतील हा विषय यंदाच्या स्पर्धेत ठेवला असावा असे कुवळेकर यांनी सांगितले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून 36 स्पर्धक सहभागी झाले होते. परिक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार रवीकिरण साने, पत्रकार निरंजन आगाशे आणि वृत्त निवेदिका स्वाती म्हाळंक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मिलिंद चाळके यांनी तर राहुल टोकेकर यांनी आभार मानले. स्मृतीचिन्ह, स्वा. सावकर लिखित ग्रंथ, स्वा. सावरकर चित्रपटाची डीव्हीडी आणि रोख पारितोषिके विजय कुवळेकर यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे :
आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे (विजेता संघ), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (उपविजेता संघ) वैयक्तिक विजेते : महेश गडदे (प्रथम, आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे), नचिकेत पानसे (द्वितीय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), सुशारद देशपांडे, (तृतीय, मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), उत्तेजनार्थ : गायत्री जोशी, (भोसला मिलिटरी स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक), चेतन माडगूळकर (जे.जे. मगदूम इंजिनियर महाविद्यालय, कोल्हापूर), करण तुपे (शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे)