जळगाव : जिल्ह्यातील गरीब,मागासवर्गीय विद्यार्थीनीला आर्थिक लाभ मिळावा यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरु करण्यात आली असून या योजनेची सहविचार सभा शिक्षण सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत पार पडली. या योजनेत सद्य स्थितीत 1 कोटी 12 लाख 600 रुपये इतकी निधी जमा असून याचा लाभ जिल्ह्यातील साडे तीन हजार विद्यार्थीनीला देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील 230 विद्यार्थीनीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेतून प्रति विद्यार्थीनीला प्रति महिना 360 रुपये आर्थिक लाभ देण्यात येत.
योजनेसाठी 11 हजार रुपयाची मदत
योजनेसाठी शिक्षण समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे यांनी 11 हजार रुपयाची मदत केली आहे. शिक्षकांच्या नियुक्तीनंतर त्यांच्याकडून 150 रुपये योजनेच्या निधीसाठी घेण्यात येत असते. तसेच प्रत्येक तालुक्यातील 300 विद्यार्थीनीला योजनेचा लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून निधी जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण समिती सदस्यांनी सांगितले. शिक्षकांच्या योगदानातून मिळालेल्या रकमेच्या व्याजाचा सदर योजना चालविण्यासाठी मदत होतेे. जिल्हा परिषदेतील प्रत्येक कर्मचार्यांनी या योजनेसाठी दरवर्षी शंभर रुपये द्यावे असे आवाहन शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी केले. सभेसाठी शिक्षण समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, अरुणा महाले, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.देवांग आदी उपस्थित होते.