सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातील डीएसकेंचा धडा वगळा – आमदार हेमंत टकले  

0
नागपूर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये यशस्वी उदयोजक म्हणून डी.एस.कुलकर्णी यांच्यावरचा धडा दिला असून हा धडा तात्काळ वगळण्यात यावा आणि पुस्तकाचे पुर्ननिरिक्षण करुन ते पुस्तक बदलण्यात यावे अशी मागणी विधानपरिषदेतील मुख्यप्रतोद आमदार हेमंत टकले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
आज एका धडयाची गोष्ट आहे न जाणो उदया आणखीन दुसरं काही घडू शकतं. आपण बघतो की राजवट बदलली की, सत्ताधाऱ्यांना हव्या असलेल्या शिक्षणप्रवाहामध्ये बदल घडवण्याचा सपाटा लावला जातो. पण हे करत असताना जी मोडतोड होतेय त्यामुळे भावी पिढीचे नुकसान होणार आहे. त्याबाबतीतही सतर्कता पाळली पाहिजे. हा काही राजकीय विषय नाही. हा विदयार्थ्यांची पिढी घडवण्याचा विषय आहे. त्याबाबतीत घडणारा हा विषय खेदजनक असून त्यावर त्वरीत कारवाई झाली पाहिजे शिवाय त्या पुस्तकाची मान्यता काढून घेतली पाहिजे आणि त्या जागी तातडीने नवीन पुस्तक अभ्यासमंडळाकडून मान्य करुन ते अभ्यासक्रमात आणले पाहिजे अशी मागणीही आमदार हेमंत टकले यांनी यावेळी केली.
यशोगाथा या पुस्तकाचं शीर्षक आहे. त्यामध्ये हा धडा आहे. त्यामध्ये वास्तु उदयोगातील अग्रणी डीएसके यांची यशोगाथा आहे. हे पुस्तक १५ जून २०१३ ला प्रकाशित करण्यात आले आहे आणि तेव्हापासून ते अभ्यासक्रमात आहे. त्यानंतरचा काळ बघितला तर डीएसके  यांच्यावर गुंतवणूकदारांना फसवल्याचे गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले आहेत. त्यामध्ये ते अटकेमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची यशोगाथा प्राध्यापक काय शिकवतील आणि डिएसकेंबद्दल विदयार्थ्यांना काय सांगणार आहेत असा सवालही हेमंत टकले यांनी उपस्थित केला.
याचा अर्थ सावित्रीबाई फुले विदयापीठाच्या शिक्षण अभ्यासक्रमात बदल होत नाही. आज २०१३ पासून २०१८ पर्यंत जर तेच चालू राहिलं तर हे सगळं अनागोंदी कारभाराचं लक्षण आहे. त्यामुळे कुलगुरुंनी यावर त्वरीत कार्यवाही करावी आणि अभ्यासमंडळामध्ये त्या विषयाचे अभ्यासमंडळ स्थापन झाले नसेल तर त्याविषयीचे निर्णय कुणी घ्यायचे असा सवाल उपस्थित करतानाच त्यामुळे ही सगळी जबाबदारी विदयापीठाच्या कुलगुरु आणि राज्याच्या शिक्षण खात्यावर येते त्यामुळे हा सावळागोंधळ निस्तरायचा कुणी आणि चुकीच्या पध्दतीने शिक्षणाचे धडे पुढच्या पिढीला दिले जाणार असतील तर किती हजार तरुणांना फसवण्यासाठी नवउदयोजक तयार होतील याची कल्पनाच न केलेली बरी अशी भीती आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.