सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
दिघी : पुण्यामध्ये जागा घेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने विवाहितेचे दागिने विकून पैसे उभारण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेवर दबाव आणला. त्यासाठी विवाहितेने नकार दिला, त्यावरून सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अब्दुल उस्मान शेख (वय 25), सासरा उस्मान आझम शेख, सासू हूरा उस्मान शेख, दीर आमीन उस्मान शेख, रुकसार उस्मान शेख (सर्व रा. गंधर्वपार्क, काळजेवाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफाना आणि अब्दुल यांचे  23 एप्रिल 2018 रोजी लग्न झाले. लग्नामध्ये इरफाना हिच्या वडिलांनी तीन तोळे सोन्याचे दागिने दिले होते. लग्नानंतर इरफाना हिच्या सासरच्या मंडळींनी पुण्यामध्ये जमिनीचा प्लॉट खरेदी केला. त्या प्लॉटचे पैसे देण्यासाठी सासरच्या लोकांनी इरफानाचे दागिने विकण्याचे ठरविले. त्यासाठी इरफाना हिने नकार दिला. त्यावरून सासरच्या लोकांनी तिला वारंवार मारहाण केली. तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी (दि. 10) सकाळी साडेनऊच्या सुमारास छताच्या आढ्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावरून इरफाना हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.