हडपसर । सासवड रस्त्यावरील खड्डे व वाहतूक यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. सत्यपूरम ते वडकी या दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूककोंडी यांमुळे दुचाकीस्वारांचे अनेकदा बळी गेले आहेत. सत्यपुरम पूर्व ते वडकी या दरम्यानचा रस्ता अरुंद आहे. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. या रस्त्याचे टेंडर निघाले असे शासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात येत नाहीत. मात्र या खड्यांमुळे व मध्यंतरी पावसाळ्यात मुरुमाने भरलेल्या खड्यांमुळे व धोकादायकरित्या दुचाकी घसरून अथवा वाहनांना धडकून बळी गेले आहेत.
बसेसचा वाहतुकीस अडथळा
आयबीएम शेजारील एका इंग्रजी माध्यमाची शाळेसमोरील पार्किंगमुळे अनेक वेळा वाहतूककोंडी होते. तुकाईदर्शनहून येणारी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे वाहनांच्या रांगा लागतात. तुकाईदर्शनमधून भेकराईनगरकडे व ऑफिसकडे जाणार्या वाहनांमुळे चौक तयार झाला आहे. त्यामुळे वाहने मध्येच घुसल्याने वाहनांच्या रांगा लागतात. त्याप्रमाणे जुना जकात नाक्यामध्ये झालेल्या पीएमपी डेपोत जाणार्या बसेस याही सासवड रोडच्या वाहतुकीस अडथळा ठरत आहे. येथून पुढे जाता अरुंद फुरसुंगी रेल्वे रुळांवरील पुलामुळे तेथेही तासन्तास दररोज वाहनांच्या रांगा लागतात.
उड्डाणपुलावर वाहतुकीचा वेग मंदावतो
उड्डाणपुलावर असलेले खड्डे मंतरवाडी फाट्यावरील खड्डे, आयबीएम समोरील खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग कमी होत असतो. वाहनांच्या रांगा लागतात यातूनच दुचाकीस्वार वाट काढत असताना घाई करतो. खडीवरून गाडी घसरणे, खड्यातून गाडी घसरल्याने दुचाकीस्वारांच्या बळी जात आहेत. या रस्त्यावर बळी जाण्याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्याची दुरवस्था. या दुरवस्थेस मुख्य कारण होत आहे ते बांधकाम खाते. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत टेंडर निघाली असली तरी दुरुस्ती होणे महत्त्वाचे आहे. टेंडरच्या प्रक्रियेनंतर काम चालू होण्यास बराच कालावधी लागणार आहे. तोपर्यंत अजून किती बळी जाणार अशी नागरिक विचारणा करीत आहेत. काही नागरिक या रस्त्यावरील ट्रक एसटी चालकांची वादावाद करतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात अशा रांगांमुळेच दुचाकीस्वार रस्ता सोडून साइडपट्टीने आपला रस्ता शोधत असतात.
आयबीएन कंपनीसमोर अतिक्रमण
काही महिन्यांपूर्वी फुरसुंगी ग्रामपंचायतीने आयबीएन कंपनीसमोर अतिक्रमण हटवले होते. परंतु तेथे पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. असेच अडथळे सत्यपुरम ते वडकी दरम्यानच्या व्यावसायिकांनी केले आहेत. तर गेल्या आठवड्यात वडकी येथे पती-पत्नीचा व एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. तोच फुरसुंगी पोलिस चौकीसमोर एका तरुणाचा जीव गेला. हे सर्व अपघात त्या रस्त्यावरील दुरवस्थेमुळे होत आहेत. त्या महिन्यातच पाच अपघात झालेत. येथील नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या रस्ते दुरुस्ती त्वरित करावी अन्यथा आंदोलन करण्याचा असा इशारा अर्चना कामटे, प्रवीण कामटे, रणजीत रासकर, गणेश ढोरे, उषा ढोरे, रोहिणी राऊत, सुहास खुटवड, अमोल कापरे, रमेश निवगुने यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.