गृह राज्यमंत्री डॉ.पाटील यांनी घेतली भेट
पिंपरी : लेखणीच्या बळावर मराठी साहित्याची सेवा करणार्या परंतु, वृद्धापकाळात आर्थिक विपन्नावस्थेमुळे कष्टात दिवस काढणार्या साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत करण्यात आली. गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी तुपे यांची भेट घेऊन मदतीचा धनादेश दिला.
तुपे यांना निधी देण्याबाबत भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली होती. मातंग ग्रुप डेव्हलपमेंन्टच्या शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मदतीसाठीचे निवेदन देण्यात आले होते. अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात सुनिल वारे, डॉ.बी.एन.गायकवाड, सचिन कुचेकर, शेखर साळवे, संकेत लोंढे यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनातर्फे तातडीने तुपे यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी तुपे यांच्या निवासस्थानी भेट देऊन धनादेश सुपूर्त केला.