साहित्य संमेलनात पुस्तकविक्री बंद

0

पुस्तक विक्रेत्यांचे धरणे आंदोलन

बडोदा : गुजरातमधील महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नगरीत म्हणजेच बडोदा येथे 91वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु असून, रविवारी संमेलनाचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी येथील पुस्तक स्टॉलधारकांनी पुस्तक विक्री थांबवण्याचा निर्णय घेऊन आयोजकांविरोधात धरणे आंदोलन सुरु केले होते. यामुळे आयोजकांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. दरवर्षी संमेलनात पुस्तक विक्रीचे विक्रम होत असतात. मात्र, यंदाच्या साहित्य संमेलनात बडोद्यात मराठी जणांची संख्या लाखांच्या घरात असताना संमेलनाला बर्‍यापैकी गर्दी असतानाही लोकांनी पुस्तकांच्या स्टॉलकडे दुर्लक्ष केले होते.

शेवटच्या दिवशी गोंधळ
विक्रीवर झालेल्या परिणामास स्टॉलधारकांनी आयोजकांना दोषी धरले असून योग्य जाहिरात न केल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बडोद्यात तापमान वाढत असताना आयोजक स्टॉलधारकांसह साहित्यप्रेमींसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पुस्तक विक्रत्यांनी केला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी साधा पंखा, थंड पाण्याचीही येथे सोय नसल्याचे स्टॉल धारकांचे म्हणणे आहे. संमेलनाच्या समारोपास काही तासच शिल्लक राहिले असताना ग्रंथविक्री बंद आंदोलन सुरु केल्याने महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.