उरण । लाथोंके भूत बातों से नहीं मानते या उक्तीप्रमाणे सभ्य भाषेत विनंत्या करूनही ऐकलं नाही या रागाने शेवटी सिंगापूर पोर्टच्या अधिकार्यांना आगरी स्टाइलने समजावणारे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या विरोधात गेल्यावर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रशांत यांना जामीन ही घ्यावा लागला होता.अधिकारी वर्गाला मारहाण केल्याच्या या प्रकरणाची सुमारे वर्षभर सुनावणी झाल्यावर या प्रकरणात उरण न्यायालयाने प्रशांत पाटील यांना निर्दोष मुक्त केले आहे. विशेष म्हणजे प्रशांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच आता प्रशांतचे राजकारण संपेल, याला किमान तीन वर्षे खडी फोडायला लागेल अशा प्रकारची खुशीची गाजरे खाणार्या अनेक पुढार्यांना मात्र या निर्णयाने चांगलीच चपराक बसली आहे.
उरणच्या जेएनपीटी बंदरात विस्ताराच्या निमित्ताने सिंगापूर पोर्ट नामक सिंगापुर शासनाची गुंतवणूक असलेला हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प वसवला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरूही झाला असून अजूनही या प्रकल्पात स्थानिक आणि भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांच्या नोकर भरतीबाबत स्पष्ट धोरण स्वीकारले गेलेले नाही. याबाबत विविध राजकीय पक्षांनी व्यक्तिगत रूपात तर अनेकांनी सामूहिक स्वरूपात सिंगापूर पोर्ट व्यवस्थापन आणि जेएनपीटी व्यवस्थापनाला ही निवेदने देऊन पाहिली. मात्र, त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृवाखालील सर्वपक्षीय संघर्ष समितीने ही निवेदने, मोर्चा अशी सर्वच आयुधे वापरून पाहिल्यावरही सिंगापूर पोर्टचे व्यवस्थापन नरमले नाही.
या पार्श्वभूमीवर प्रशांत पाटील यांनी हा विषय राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्याकडेही नेला होता त्यावर पवारांनी जेएनपीटीचे तत्कालीन अध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि सिंगापूर पोर्टचे व्यवस्थापन यांची एकत्रित बैठक आपल्या निवासस्थानी घेऊन स्थानिकांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याचे सांगितले होते. मात्र, त्याचाही कोणताही फरक संबंधितांवर झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी आगष्ट महिन्यात सर्व पक्षीय कमिटीच्या मागणी नुसारच जेएनपीटीच्या प्रशासकीय भवनात सिंगापूर पोर्टचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कमिटीचे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बाचाबाची आणि हमरीतुमरीनंतर सुरेश अमीर अप्पू आणि दादाजी जगताप यांना संतप्त राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी आपल्या स्टाइलने आगरी दणका दिला होता. याबाबत अमीर अप्पू अथवा दादाजी जगताप यांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार केली नव्हती. उलट प्रशांत पाटील यांच्या आक्रमक पवित्र्याने गर्भगळीत झालेल्या सिंगापूर पोर्ट व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्त भरतीच्या आड येत असलेल्या कॅप्टन मृत्युंजय धवन यांना 19 ऑगस्ट 2017 पूर्वी काढून टाकण्याचे आसन दिले होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला
या सर्व घडामोडी च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटी प्रशासन भवनातील बाचाबाची प्रकरणाला सुमारे दहा दिवस झाल्यावर राजकीय दबावापोटी जेएनपीटीच्या कुलकर्णी नामक अधिकार्यांनी प्रशांत पाटील यांच्या विरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात अगदी केम्द्रीय नौकानयन मंत्र्यांनीदेखील लक्ष घालून अधिकारी वर्गाला खडसावून तक्रार दाखल करण्यासाठी राजकीय दबाव टाकला होता. त्यामुळेच दाखल झालेल्या न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील तक्रारीवर आधारित गुन्ह्यात मागील सुमारे 8 महिने झालेल्या सुनावणीनंतर प्रशांत पाटील यांना उरण न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.