मुंबई । राज्यातील सिंचनाखालील जमीन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात दोन नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या जलसिंचन आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाविषयी माहिती देताना गडकरींनी सांगितले की, देशात नदीजोड प्रकल्पावर विचार सुरू आहे. त्यात राज्यात दोन नदीजोड प्रकल्पांबाबत चर्चा सुरू आहे. या दोन प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न सुटू शकेल, असेही गडकरींनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पतील गैरव्यवहारांच्या चौकशीबाबतच्या चार प्रकरणांवर प्रकाश टाकला.
26 प्रकल्प होणार पूर्ण
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यातील अपूर्ण अवस्थेत असलेले 26 प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत हे प्रकल्प समावेशित करण्यात आले असून 5 प्रकल्प पूर्णत्वास आले असल्याचे सांगत उर्वरित प्रकल्प देखील लवकरच पूर्णत्वास येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पांचा फायदा विदर्भासह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला देखील होणार असल्याचे ते म्हणाले. गडकरी यावेळी म्हणाले की, परी तापी नर्मदा, दमणगंगा या महत्वाच्या प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रूपए लागणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी 18 हजार कोटी केंद्राकडून तर उरलेले दोन हजार कोटी महाराष्ट्र व गुजरात सरकारकडून तरतूद केली जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. एका खोर्यातील पाणी दुसर्या खोर्यात पाठवण्याच्या महत्वाच्या प्रकल्पावर काम सुरु असल्याचे ते म्हणाले. जवळपास 25 हजार कोटी आम्ही अन्य प्रकल्पांसाठी देणार आहोत असे गडकरी म्हणाले. गोदावरीच्या खोर्यात नाशिक गोदावरी प्रकल्पामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची समस्या सुटेल. गुजरात आणि महाराष्ट्रातील करार वादामध्ये अडकला होता तो प्रश्न मिटला असून आता पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी नारायण राणे यांच्या प्रवेशाबद्दल विचारले असता ही पत्रपरिषद खराब झालेल्या रस्त्यांसाठी असून जे रस्त्याने भरकटले सांगितल्यानंतर त्यांनी बोलणे टाळले.
ठाकरे, राणेंवर निशाणा
आपल्या काळात उत्तम रस्ते झाल्याचे सांगत मुंबईत देखील त्या प्रकारचे रस्ते होऊ शकतात मात्र दुर्दैवाने माझ्याकडे मुंबईतील कुठलाच रस्ता नाही, असे सांगताना गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. माझं उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन तीन वेळा बोलणं झालं मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी मदत मागीतली तर मी निश्चितपने मदत देईल असे गडकरी म्हणाले.
गैरव्यवहारांची चौकशी सुरु
दरम्यान यावेळी महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांच्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणांची चौकशी सुरु असून 4 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले असल्याचे सांगितले. चौकशी प्रकरणातील चारही प्रकरणाचे चौकशी करून एका-एका प्रकरणाची चार्जशीट ही 30-30 हजार पानांची असल्याने वेळ लागत असल्याचे ते म्हणाले. निपक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.
राहुल गांधींना 5 हजार कोटी देतो, कर्जमाफी करावी
राज्यात केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी झाली असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 15 वर्ष राज्यात त्यांचेच सरकार होते. हे त्यांचेच पाप आहे, आम्ही सुधारणा करतोय. मी 5 हजार कोटी राहुल गांधींना देतो त्यांनी कर्जमुक्ती करून दाखवावी असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. त्यांना शेती माहिती असती तर राज्यात आणि देशात ही स्थिती निर्माण झाली नसती असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.