सिंडीकेट बँकेला मिळाला कृषी वित्त शाखेचा दर्जा

0
बँकेने दहा दिवसांत 18 कोटीचे केले वाटप
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील सिंडीकेट बँकेला कृषी वित्त शाखा म्हणून नव्याने दर्जा प्राप्त झाला असल्याचे बँकेचे कार्यकारी संचालक एस. कृष्णन यांनी सांगितले. नुकताच सिंडीकेट बँकेला दर्जा प्राप्त झाला आहे. या नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच कृष्णन यांच्या हस्ते पार पडले. या वेळी बँकेचे ग्रामीण विभागाचे महाप्रबंधक सी. बी. एल. नरसिंहराव, टी. मनीवष्णन, उपमहाप्रबंधक आर. कृष्णण, पंडित शिकारे, ज्ञानेश्‍वर शेळके, पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकूंद ठाकर, ज्ञानेश्‍वर ठाकर, चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्‍वर आडकर, शाखाधिकारी जे. के सिंग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्‍यांची कर्ज प्रकरणे लवकर होणार
यावेळी उपस्थित बँकेच्या सभासदांना मार्गदर्शन करताना कृष्णन म्हणाले की, सिंडीकेट बँकेने हा विशेष दर्जा प्राप्त केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जप्रकरणाला होणार्‍या विलंब कमी होईल. बँक शेतकर्‍यांच्या वृद्धिसाठी कार्यरत राहिल तसेच सुधारित तंत्रज्ञानावरील शेतीसाठी लागणार्‍या मोठ्या गुंतवणुकीसाठी कर्जपुरवठा केला जाईल. यावेळी बँकेने दहा दिवसांत 18 कोटी रूपये वाटप केले. बँकेचे शाखाधिकारी जे. के. सिंग यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कर्जप्रकरण मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. बँकेचे शाखाधिकारी जे. के. सिंग यांनी प्रास्ताविक केले. आर. कृष्णन यांनी आभार मानले.