सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावरील गर्डर उभ्या ट्रालावर कोसळला
सुदैवाने जीवीतहानी टळली : बांधकामावर उभे राहिले प्रश्नचिन्ह
बुलढाणा : समृद्धी महामार्गाच्या मुंबई-नागपूर महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ सुरू असलेल्या पुलाचा गर्डर उभ्या ट्रॉलावर आदळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकार्पणाच्या घाईगडीब निकृष्ट काम केले जात असल्याचा आरोप आहे.
मजूर जेवायला गेल्याने दुर्घटना टळली
स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा परीसरात भव्य पुलाचे बांधकाम सुरू असून काम सुरू असताना अचानक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली मात्र, सर्व मजूर जेवायला गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अचानक या पुलाचा काही भाग कोसळला आणि या पुलाखाली असलेल्या मोठ्या ट्रेलरवर पडला, त्यामध्ये ट्रेलर्स पूर्णपणे तुटला असून हा पूल कोसळताना सर्व मजूर जेवत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
ऑडीट करून कामाला व्हावी सुरूवात
राज्य शासनाने देखील या महामार्गावरील पुलाचे तसेच इतर रस्त्याचे चांगल्या प्रकारे ऑडिट करून नंतरच पूल सुरू करावा, अन्यथा या रस्त्यावर अशाप्रकारे घटना घडल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.