जळगाव । सिंधी कॉलनीतील एका महिलेच्या घराचा मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील 20 हजार रूपये चोरून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. त्याला सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. ठाकूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सिंधी कॉलनीत जय भद्रा ऑटो पार्टच्या मागे हेमलता मनोजकुमार नाथानी या तीन मुलांसह राहतात. घराच्या समोरच एका छोट्या दुकानात त्या चिवडा, बिस्कीट व कुरकुरे विक्री करतात. शनिवारी संपूर्ण आठवड्याचा हिशेब करून त्यांनी पैसे कपाटात ठेवलेले होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी 5 वाजता त्या तीघ मुलांना घेऊन बगिच्यात गेल्या होत्या. रात्री 8 वाजता घरी आल्यानंतर त्यांना कपाट उघडे व त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तसेच घराचा मागचा दरवाजाचे कुलूप तोडलेले होते. तेथुनच चोरटे घरात आले होते. त्यांनी कपाटात ठेवलेले 20 हजार रूपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. याप्रकरणी नाथानी यांनी रविवारी रात्री एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली होती. दरम्यान, रविवारी सकाळी 11 वाजता पोलिसांनी घराची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी राजू लक्ष्मण रिल याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायाधीश ठाकूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.