सिंधूने उडवला कॅरोलिनाचा धुव्वा

0

नवी दिल्ली । भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखदार स्पेनच्या कॅरोलिना मरीनवर तिने 21-19 21-16 असा विजय मिळवला. रिओ ऑलिंपिकच्या फायनलमध्ये सिंधूला हरवणार्‍या कॅरोलिना मरीनशी तिची पुन्हा एकदा गाठ पडली होती. अंतिम फेरीत सिंधूने स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा 21-19 आणि 21-16 असे दोन सलग गेम जिंकून धुव्वा उडवत रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. कॅरोलिन आणि सिंधू आतापर्यंत नऊवेळा आमनेसामने आल्या असून यातील पाच लढती मरिनने, तर चार लढतींत सिंधूने बाजी मारली आहे. रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत मरिनने सिंधूवर मात केली होती. त्या पराभवाचा आज सिंधूने वचपा काढला.

सुरूवातीपासून सिंधू कॅरोलिना मरीनावर आक्रमक
सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. संपूर्ण सामन्यात सिंधूचं वर्चस्व राहिले. पहिला गेम 21-19 असा चुरशीचा झाला तर दुसर्‍या गेममध्ये सिंधूने कॅरोलिनाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलंलं. सिंधूने दुसरा गेम 21-16 अशा मोठ्या फरकाने जिंकला. अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियम खच्चून भरलं होतं. या प्रेक्षकांना सिंधूच्या अफलातून खेळाचे दर्शन घडलं. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत सिंधूला कॅरोलिनाकडून पराभव पत्करावा लागल्याने सुवर्णपदकही गमवावं लागलं होतं. त्याची सल सिंधूसह प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. या पराभवाची परतफेड भारतीय प्रेक्षकांच्या साक्षीनेच आज सिंधूने केली.

सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू समोर होते मोठे आव्हान
इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसरे मानांकन मिळालेल्या सिंधूसमोर मरीनचे मोठे आव्हान होते. कॅरोलिना मरीन जगातली अव्वल मानांकित खेळाडू आहे. पण आजच्या मॅचमध्ये सिंधूलाच अ‍ॅडव्हांटेज होते. रिओ ऑलिंपिकनंतर आपला खेळ जबरदस्त सुधारणार्‍या सिंधूला घरच्या प्रेक्षकांनी चांगलीच साथ दिली. सिंधूने मरीनला सरळ गेम्समध्ये नमवण्याची किमया साधली. मॅचमध्ये सुरूवातीपासूनच सिंधूचं वर्चस्व होतं. मॅचच्या सुरूवातीलाच सिंधूने 6 पॉईंट्सची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. पण आपण जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल का आहोत याची चुणूक दाखवत कॅरोलिना मरीनने ही पिछाडी भरून काढत मॅचमध्ये पुनरागमन केलं. पण सरतेशेवटी पहिला गेम सिंधूच्याच खिशात गेला. दुसर्‍या गेममध्ये आपला खेळ आणखी उंचावत सिंधूने मरीनवर पॉईंट्सची आघाडी चांगल्या फरकाने राखली आणि इंडिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर आपलं नाव कोरले.

सामना चालला 47 मिनीटे
सिंधू आणि कॅरोलिना मरीनची याआधी नऊ वेळा गाठ पडली होती यापैकी 5 सामने मरीनने तर 4 सामने सिंधूने जिंकले होते. आजच्या या विजयासोबतच सिंधूने आता कॅरोलिना मरीनसोबत बरोबरी साधली आहे. 07:27 – पी.व्ही सिंधूला इंडिया ओपन सुपर सीरिजचं जेतेपद 21-19, 21-16, 07:03 – पी.व्ही. सिंधूने पहिला गेम 21-19 ने जिंकला, 06:40 – पी.व्ही सिंधू आणि कॅरोलिना मरीनचा महामुकाबला सुरू झाला. या स्पर्धेमध्ये मरिनला अव्वल मानांकन मिळाले आहे तर सिंधूला तिसरे मानांकन आहे. गेल्या वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकनंतर सिंधूच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. या सामन्याच्या सुरुवातीपासून सिंधूने आक्रमक खेळी केली. तर कॅरोलिनानेही सिंधूला चांगली टक्कर दिली. दोघींच्यामध्ये 47 मिनिटे लढत झाली.