सिंहगडच्या तासिका सुरू करा

0

पुणे । सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयातील तासिका व प्रात्याक्षिके सुरू करावीत, अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी केली आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना यासंदर्भातील पत्र दिले आहे. दरम्यान, शिक्षकांच्या पगाराची 50 ते 60 टक्केच रक्कम प्रलंबित असून शासनाकडून संस्थेला 117.57 कोटी इतकी रक्कम येणे आहे, त्यामुळे प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे निवेदन संस्थेने केले आहे.

आंदोलनाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची वडगाव, नर्‍हे, कोंढवा, वारजे, लोणावळा, सोलापूर आदी ठिकाणी 22 आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. एआयसीटीईकडे तक्रार केल्यानंतर 31 जानेवारीच्या आत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन द्यावे असे निर्देश दिले होते. परंतु संस्थेला या निर्देशाचे पालन करता आले नाही. सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या 22 महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना गेल्या 16 महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

50 ते 60 टक्केच पगार प्रलंबित
सिंहगड संस्थेला स्कॉलरशिपपोटी थकलेली 80 टक्के रक्कम अदा करण्यात आल्याचे प्रसारित करण्यात आले; परंतु तशी वस्तुस्थिती नाही. शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी समाजकल्याण विभागाकडून 117.57 कोटी इतकी रक्कम येणे आहे. शिक्षकांना गेल्या 14 महिन्यांपासून पगार दिला गेलेला नाही, हे सत्य नाही. सरासरी 50 ते 60 टक्के इतकीच पगाराची रक्कम वरील कारणामुळे प्रलंबित आहे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे निवेदन सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले.