पुणे । सिंहगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय पुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अडीच कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरोधात लढा देऊन स्वराज्याचे रक्षण केले आहे. बराच काळ त्यांचे वास्तव्य सिंहगडावर होते. त्यांचे देहावसान 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावर झाले.
इमारत लहानशी घुमटी स्वरुपाची
सिंहगडावर छ. राजाराम महाराजांची समाधी असून सध्या समाधीची जागा साताराचे छत्रपती उदयनराजे यांच्या नावावर आहे. समाधी म्हणून जी इमारत ओळखली जाते, ती लहानशी घुमटी स्वरुपाची आहे. या घुमटीचे बांधकाम पेशवेकालीन बांधकामासारखे असून घुमटीमध्ये पुरातन मंदिरासारखे दगडी बांधकाम आहे. हे बांधकाम वेगवेगळ्या रंगाने रंगविलेले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व पाहता या ठिकाणाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याने छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाचे सुशोभिकरण करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाचे सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने अंदाजपत्रकीय तरतूदही केली आहे.
कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्टकडे काम
स्थानिकांच्या मागणीनुसार समाधी स्थळाचे सुशोभिकरण करण्याचे काम पुरातत्व विभागाकडील किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणार्या कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्स्टतर्फे राहुल समेळ यांना देण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 89 मधील तरतूदीनुसार स्थायी समितीमार्फत मुख्यसभेची मान्यता घेऊन दिले जाणार आहे. या संबंधीच्या प्रस्तावास स्थायीने मान्यता देऊन निधी देण्यास मंजुरी दिली आहे.