सिंहगडावर पोलिसांचा ‘वॉच’

0

हवेली । हवेली तालुक्यातील सिंहगड आणि वेल्हे तालुक्यातील पानशेत भागात नवीन वर्षाच्या निमित्ताने होणार्‍या ‘ओल्या पार्टी’वर पोलिसांची आता करडी नजर असणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने 31 डिसेंबरला अनेक ठिकाणी मोठ्या पार्ट्या करण्याचा बेत आखला जातो. अशा पार्ट्यांमधून अनुचित प्रकार घडत असतात, तर काही ठिकाणी हुल्लडबाजी होत असते. अशा अनेक बाबींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच अशा ठिकाणांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍या तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती हवेली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्‍वंभर गोल्डे आणि पानशेत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप कोंडे यांनी सांगितले.

हॉटेलचे बुकींग फुल्ल
सिंहगड आणि पानशेत पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऐन थंडीत निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी आणि सिंहगड किल्ला पाहण्यासाठी, तसेच खडकवासला, पानशेत धरण पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत भर पडत आहे. याचबरोबर नवीन वर्षानिमित्त काही ठिकाणी ओल्या पार्ट्यांचाही बेत आखला जात आहे. यासाठी या भागातील काही हॉटेल, बंगले तसेच रो-हाऊस यांच्या बुकिंगला सुरुवात झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

अनुचित प्रकारांची शक्यता
सिंहगड-पानशेत भागात हॉटेल, बंगले, रो-हाऊस यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खडकवासला, पानशेत धरण, तसेच सिंहगड किल्ला अशा ठिकाणी काही पर्यटक मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात, तर अशा पर्यटन स्थळांवर काही दिवसांनी दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात. त्यामुळे या ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, तसेच इतर पर्यटकांनाही नवीन वर्षाचे स्वागत करताना त्रास होणार नाही, यांची कळजी घेणे आवश्यक आहे.

कडक कारवाई
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने सिंहगड, पानशेत भागात पार्ट्या करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांचे या भागात स्वागत होत असते. मात्र पर्यटनांच्या नावाखाली हुल्लडबाजी करणार्‍या तळीरामांवर कायद्यानुसार पोलिस कडक कारवाई होणार आहे.
विश्‍वंभर गोल्डे,
पोलिस निरीक्षक, हवेली ग्रामीण