जळगाव। शहरातील चोपडा मार्केटमधील सिगारेटच्या गोडावूनमधून 26 जानेवारीला चोरट्यांनी 52 लाख 96 हजार रुपये किंमतीचे 67 सिगारेटचे बॉक्स चोरून नेले होते. याप्रकरणी गोडावून मालकाच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा पेठ पोलिसांना याप्रकरणी पनवेल येथून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायाधीश व्ही.एच.खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
52 लाखांच्या सिगारेट चोरी
चोपडा मार्केटमध्ये सुरेश पाटील यांच्या मालकीचे भारद्वाज एजन्सी, संतोष ट्रेडर्स ह्या सिगारेटच्या गोडाऊन मधून चोरट्यांनी 26 जानेवारी रोजी 52 लाख 96 हजार रुपये किमतीचे 67 सिगारेटचे बॅाक्स वाहनात भरून चोरून नेले होते. यात चोरट्यांनी पिकअप व्हॅन (क्र. एमएच-12-एलटी-7646) वापरली होती. ही व्हॅन चोरीची असल्याचे उघड झाले होते. मात्र साडेतीन महिन्यांपर्यंत पोलिसांना या चोरट्यांचा सुगावा लागला नव्हता. पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच पद्धतीने चोरी झाली होती.
या चोरीत पनवेल पोलिसांनी अमोल बाळासाहेब दुसींग (वय 25), विलास शिवाजी वाघ (वय 23) आणि अरविंद रमेश बागूल (वय 34, तिघे रा. निमगाव, ता. श्रीरामपूर) या तीन संशयिताना अटक केली होती. या संदर्भात जिल्हापेठ पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस उप निरीक्षक गिरीधर निकम, रवी तायडे, भटू नेरकर, शेखर पाटील यांचे पथक सोमवारी या संशयिताना ताब्यात घेण्यासाठी पनवेल येथे गेले होते. मंगळवारी त्यांना ताब्यात घेऊन रात्री 12.40 वाजेच्या सुमारास त्यांना अटक केली.
12 मे पर्यंत पोलिस कोठडी
चोपडा मार्केटमध्ये सुरेश पाटील यांच्या मालकीचे भारद्वाज एजन्सी, संतोष ट्रेडर्समधून सिगारेट चोरी करताना चोरट्यांचे चेहरे सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाले होते. त्या फुटेज मधील चोरट्यांचे चेहरे आणि पनवेल पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांशी मिळते जुळते आहेत. त्यांना मंगळवारी रात्री अटककरून बुधवारी न्यायाधीश व्ही.एच.खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असतात त्यांनी 12 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.
अडीच कोटींच्या सिगारेटवर डल्ला…
सिगारेट चोरट्यांनी 20 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अठरा दिवसात जळगावसह पनवेल, खोपोली, पुणे आणि नवी मुंबई परिसरातील कामोठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा एकूण पाच ठिकाणी चोर्या केल्या होत्या. या सर्व चोरीच्या ठिकाणी त्यांनी एक सारखीच पद्धत वापरली आहे. अठरा दिवसात चोरट्यांनी आतापर्यंत 2 कोटी 44 लाख 91 हजार 101 रुपयांच्या सिगारेटवर डल्ला मारला होता. मात्र पोलिसांच्या हाती केवळ सीसीटिव्ही कॅमेर्याच्या फुटेज व्यतिरीक्त काहीच लागले नव्हते. मात्र पनवेल पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.