सिडको प्रदर्शन केंद्राच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी

0

नवी मुंबई । शिवसेनेचे खासदार राजन विचारे सोमवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात झालेल्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेले असता त्या ठिकाणी प्रदर्शन केंद्राची झालेली दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास आली.त्याचवेळी तेथील उद्योजकांनी या प्रदर्शन केंद्राचे भाडे जास्त असून सोई सुविधा पुरवल्या जात नाही, अशा तक्रारीही विचारे यांच्याकडे केल्या. यानंतर त्या प्रकरणाची चौकशी केली असता हे प्रदर्शन केंद्र एशियन कन्व्हेन्शन अ‍ॅन्ड एक्झिबिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 5 वर्षांच्या करारावरती चालवण्यासाठी दिले असल्याचे विचारे यांना समजले.

ही कंपनी लोकोपयोगी सेवा भावी संस्थेकडून दिवसाचे भाडे 11 लाख वसूल करत आहे. विचारे यांनी तत्काळ सिडको व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन सिडकोने 240 कोटी खर्च करून विकसित केलेल्या वाशी सेक्टर 20 मधील सिडको प्रदर्शन केंद्राच्या झालेल्या दुरवस्थेबाबत तसेच एशियन कन्व्हेन्शन अ‍ॅन्ड एक्झिबिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून स्वीकारले जाणारे दर व मिळणार्‍या सुविधांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.