नवी मुंबई । आजचे युग हे माहीतीचे युग आहे. आणि माहितीचा हा अथांग सागर आपल्याला सहज उपलब्ध देखील आहे. विद्यार्थ्यांनी योग्य ती वाट निवडून त्याअनुषगांने जिद्दीने मेहनत केली तर यश नक्की मिळेल. मुलांच्या यशात त्यांच्या पालकांचादेखील सहभाग असतो. मुलांच्या यशामागे पालकांची व खास करून पाल्याच्या आईची मेहनत अधिक असते. पालकांनीदेखील अशाच प्रकारे आपल्या पाल्याला प्रोत्साहन दिले तर त्यांच्या पाल्याला यश खात्रीने मिळेल असे मत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी सिडको कर्मचार्यांच्या पाल्यांच्या कौतुक सोहळ्यादरम्यान व्यक्त केले.’ हा सोहळा मंगळवारी सिडको भवन येथे पार पडला. सिडको महामंडळातर्फे सिडको कर्मचार्यांच्या इयत्ता दहावी व बारावीत घवघवीत यश मिळवलेल्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्य/सीबीएसई/आयसीएसई बोर्डात नेत्रदिपक यश मिळवलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा, व्यवस्थापक कार्मिक विद्या तांबवे, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल, सिडको कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जे टी पाटील, सिडको बी.सी. एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद बागुल व सिडकोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज करीयरसाठी अनेक नवनवीन संधी उपलब्ध आहेत. पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, सरकारी नोकरी अशा सरधोपट वाटांपेक्षा कला, क्रीडा, समाजसेवा अशा भिन्न पण अनोख्या करीयर पर्यायांचा विचार करा असे आवाहन विनय कारगांवकर यांनी विद्यार्थ्यांना केले. त्याचप्रमाणे राजकारणात जाऊन समाजात चांगले बदल घडवा असा सल्लादेखील त्यांनी दिला. आजची पिढी ही रिस्क टेकर आहे. त्यामुळे खूप मोठी स्वप्न पहा व ती पूर्ण करण्याचा ध्यास मनाशी बाळगून अविरत मेहनत करा. आपल्या मनाला व स्वप्नांना कोणतीही मर्यादा नसते आणि म्हणूनच ते मिळवण्यासाठी लागणार्या कष्टांनादेखील मर्यादा नसली पाहिजे असे मत प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी व्यक्त केले. सोहळ्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2017 मधील बारावीतील एकूण 46 तर दहावीतील एकूण 60 विद्यार्थ्यांचा अशा 106 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कु. रीया घरत व कु. सोनल घुडे या शैक्षणिक वर्ष 2017 मधील बारावीच्या प्रथम क्रमांक पटकावणार्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप व रू. 2 हजार रोख रक्कमेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण होते. आपण केलेल्या कष्टांना अशा प्रकारे मिळणारी कौतुकाची थाप पाहून विद्यार्थीदेखील भारावून गेले होते. सिडको महामंडळाने कर्मचारी कल्याण योजनेंतर्गत सन 1982 पासून या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले होते. सिडको महामंडळ केवळ कर्मचार्यांच्याच नव्हे तर कर्मचार्यांच्या पाल्यांचेदेखील मानसिक धैर्य उंचावण्यावर विश्वास ठेवते.