वाहन चालक पसार : वनविभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह
यावल : यावल पोलिस गस्तीवर असताना एक वाहन संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जात असल्याने यावल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात पाच लाख रुपये किंमतीचे सागवान आढळले तर पोलिसांना पाहताच वाहन चालक मात्र पसार झाला. यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सोमवारी सकाळी 11.30 वाजता ही कारवाई केली.
वाहन चालक पसार
डांभुर्णी-डोणगाव रस्त्यावर (एम. एच. 05 आर.3719) हे टाटा कंपनीचे चार चाकी वाहन वेगाने जात असल्याने संशय आल्यानंतर या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर रस्त्यावर वाहन सोडून त्याचा चालक पसार झाला. वाहनात अत्यंत महागड्या नवीन सागवानी लाकडाच्या 20 पाट्या आढळल्या. बाजार भावाप्रमाणे अंदाजे त्याची किंमत पाच लाख तर, सरकारी किंमत सुमारे अडीच लाख रूपये असल्याची माहिती आहे. यावल पोलिसांनी हे वाहन जप्त करीत कायदेशीवर कारवाई सुरू केली आहे. निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेबुब तडवी, निलेश वाघ, जगन्नाथ पाटील, चालक भैय्या पाटील, मदतनीस युवराज घारू यांच्या पथकाने ही करवाई केली. पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वाहन चालक भरत बाविस्कर, अशोक मराठे, वनपाल असलम खान यांच्या प्रमुख उपस्थितीत या सागवानी लाकडाचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान दिवसा ढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाची खुलेआम तस्करी होत असतांना यावल पश्चिम वन विभागाचे याकडे दुर्लक्ष कसे ? असा प्रश्न आहे. दरम्यान, पकडलेल्या वाहनांचे दोन क्रमांक असल्यानेही संशय अधिक वाढला आहे.