सिनेस्टाईल पाठलाग ; मालेगावचे सात शिकारी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

0

नीलगायीची शिकार उघड ; बंदुकीसह घातक शस्त्र जप्त

पाचोरा- वनप्राण्यांची शिकार करून शिकारी चारचाकी वाहनातून पसार होत असल्याची गुप्त माहिती पाचोरा पोलिसांना मिळाल्यानंतर लावलेल्या सापळ्यात वरखेडी गावाजवळील नाक्यावर मालेगावातील सात शिकार्‍यांना पकडण्यात पाचोरा पोलिसांना यश आले. आरोपींच्या ताब्यातून बारा बोअरची बंदूक, पाच वापरलेली तर 16 जिवंत काडतुसे, सर्च लाईट, तीन सुरे व दोन कुर्‍हाडभ जप्त करण्यात आल्या. नाकाबंदी दरम्यान आरोपींनी पोलिसांचे बॅरीगेट तोडून पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

अट्टल शिकारी पोलिसांच्या जाळ्यात
वहिइदू यासीन, महंम्मद जफर हसन , आरीफ अहमद, शहेजाद इकबाल, रशीद अहमद, जमील अहमद, शेख शकूर (सर्व मालेगाव) या सात शिकार्‍यांना अटक करण्यात आली तर आरोपींच्या ताब्यातील चारचाकी सुमो (एम.एच.15 बीडब्ल्यू 5423) जप्त करण्यात आली. नीलगायीच्या मांसासह चार लाख 46 हजार 710 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक केशव पातोंड यांच्या मार्गदर्शाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामकांत सोमवंशी, एपीआय सचिन सानप, उपनिरीक्षक पंकज शिंदे व डीबी कर्मचार्‍यांनी यशस्वी केली. आरोपींच्या अटकेसाठी पाचोरा व जामनेर रस्त्यावर तीन अधिकार्‍यांसह 25 पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रविवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले. आरोपींनी रविवारी रात्री जामनेर परीसरातील जंगलात नीलगायीची शिकार करीत मांस वाहनात टाकत मालेगावच्या दिशेने कूच करताना त्यांना पकडण्यात आले. आरोपींनी यापूर्वीही या भागात वन्यप्राण्यांची शिकार केल्याची शक्यता असून त्यांना या भागाची खडा न खडा माहिती असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्या तसेच आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.