‘सिमी’ पुस्तकाचे 6 रोजी प्रकाशन

0

जळगाव । सिमीच्या दहशतवादी कारवायांमध्ये तरूणांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागाच्या प्रवासावर आधारीत सिमीः दी फर्स्ट कनव्हीक्शन इन इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन 6 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची माहिती लेखक वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सायंदैनिक साईमतचे कार्यकारी संपादक विजय वाघमारे यांनी या पुस्ताकचे लेखन केले आहे. 17 वर्षापुर्वी सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या देशविघातक कार्यास सुरुवात झाले. 1977 मध्ये उत्तर प्रदेशात ’सिमी’चा उदय झाला. समाजविघातक कृती करणार्‍या या संघटनेशी जळगावचे नाव जोडले जाणे ही धक्कादायक बाब होती. सिमी संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम तरूणांमध्ये इस्लामिक विचारांची मुल्ये रूजविणे, त्यांना उच्चशिक्षीत करणे आणि राजकीय दृष्ट्या जागृत करण्याचा उद्देश होता. मात्र कट्टरवादी लोक या संघटनेत शिरल्यामुळे संघटना मुळ उद्देशापासून भरकटली होती.

12 प्रकरणांचा समावेश
या पुस्तकात एकूण 12 प्रकरणांचा समावेश असून सर्व प्रकरणांचा पुराव्यासहीत उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकाला अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची प्रस्तावना लाभली आहे. जळगाव पोलीस दलाच्या अहवाल थेट संसदेपर्यत पोहोचल्याने तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी सिमी संघटनेवर बंदी आणली होती. त्यामुळे भविष्यात सिमी खटल्यावर आधारीत या पुस्तकाचा वापर विविध संदर्भासाठी अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे.

धक्कादायक उलगडा
अभिनव निर्माण प्रकाशन पुणे या संस्थेने पुस्ताकाचे प्रकाशन केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल (लेवाभवन) सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वृत्तपत्रात काम करतांना आलेल्या अनुभवातुन पुस्तक लिहण्याचा निश्‍चय केला. दोन ते अडीच वर्षापासून पुस्तकाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेत होते. जळगाव शहरात सिमी खटल्यात घडलेल्या अनेक धक्कादायक प्रकाराचा उलगडा या पुस्तकात करण्यात आले आहे.

विविध मान्यवरांची उपस्थिती
जेष्ठ विधीज्ञ विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खा. ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सायंदैनिक साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, प्रा.आर.एन.महाजन, समीर देवकर आदी उपस्थित राहणार आहे.