ACB nets punter with bribed agricultural assistant in Sillod औरंगाबाद : कांदा चाळ अनुदान मंजूर करून देण्यासाठी तडजोडीअंती पंटराच्या माध्यमातून पाच हजारांची लाच घेताना सिल्लोड कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक विलास सुरेश वाघ (30) व खाजगी पंटर सागर कृष्णा शेळके (27, रा.कसोद, पोस्ट तळणी, ता.सिल्लोड) यांना औरंगाबाद एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, कृषी मंत्री तालुक्यात हार्वेस्टर वाटप करीत असताना त्याच विभागातील लाचखोर अधिकार्याला पकडण्यात आल्याने या बाबीचीही चर्चा रंगताना दिसून आली.
पंटराच्या माध्यमातून स्वीकारली लाच
44 वर्षीय तक्रारदाराने कांदा चाळ अनुदान मंजूर करण्यासाठी कृषी सहाय्यक विलास वाघ यांची भेट घेतली होती मात्र 6 सप्टेंबरच्या भेटीत वाघ व पंटर शेळके यांनी तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. 7 रोजी आरोपी पंटर शेळके याने लाच स्वीकारताच वाघ यासदेखील अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीधखक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, अंमलदार सुनील पाटील, रवींद्र काळे, केवल गुसिंगे, भूषण देसाई, चालक चंद्रकांत शिंदे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.