जळगाव। शहरातील हॉकर्संला स्थलांतर प्रक्रीया महानगर पालिकेकडून राबविण्यात येत आहे.यानुसार सिव्हीक सेंटर येथे 85 हॉकर्सचे स्थलांतर शनिवारी 15 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. हॉकर्स स्थलांतर करण्यासाठी सोमवार 10 एप्रिल रोजी अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांच्या उपस्थितीत जागा वाटपाची सोडत काढण्यात आली होती. यासोडतीत चित्रा चौक ते टावर चौक, चित्रा चौक ते गणेश कॉलनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गोविंदा रिक्षा स्टॉप येथील नोंदणीकृत हॉकर्स यांची सोडत काढून त्यांना जागा वाटप करण्यात आली आहे. या हॉकर्सला 12 एप्रिलरोजी स्थलांतर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर स्थलांतर करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार आज शनिवार 15 एप्रिल रोजी हॉकर्सचे स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते.
मनपातर्फे लाईट व्यवस्था नाही
चित्रा चौक ते गणेश कॉलनी येथील 85 हॉकर्स यांना सिव्हीक सेंटर येथे जागा देण्यात आली आहे. यात भाजीपाला विक्रेते, फळ विके्रते, नाश्ता सेंटर चालविणारे यांना टाईम झोन आखून देवून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्यवसाय करावयाचा आहे. तर शिवाजी महाराज पुतळा व गोंविदा रीक्षा स्टॉप येथील 28 नॉन व्हेज विक्रेत्यांना संध्याकाळी 6 ते 10 सिव्हीक सेंटर टाईम आखुन देण्यात आला आहे. शनिवारी सिव्हीक सेंटर येथे सकाळी 10 वाजेपासून अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान, बांधकाम विभागतील इंजिनिअर संजय पाटील, आतीष राणा, नासिर भिस्ती, संजय परदेशी हजर होते. यावेळी सिव्हिक सेंटर येथे 6 बाय 6 जागा आखून देण्यात आलेली आहे. महानगर पालिकेचे अधिकारी सकाळपासून हजर असले तरी हॉकर्स फक्त जागेची पहाणी करून जातांना दिसले. तरी तेथे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 28 नॉन व्हेज विक्रेत्यांना जागा वाटप करण्यात आली आहे. परंतु, या जागेत सफासफाई केलेली असली तरी तेथे संध्याकाळी बसणार्या विके्रत्यांसाठी लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही.