जळगाव। कारागृहातील आजारी कैद्यांना उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले जाते, सिव्हीलमध्ये कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. कारागृहात प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर जेल प्रशासनाच्या अनुमतीने संबधित कैद्यास सिव्हीलमध्ये दाखल केले जाते. याठिकाणी कैद्याला झालेल्या आजारासंदर्भात विविध चाचणी घेणे आवश्यक ठरते. परंतु काय त्रास होतोय, अशी विचारणा करून दोन गोळया देऊन कैद्यास सोडण्यात येत असल्याचा प्रकार सिव्हीलमध्ये होत असल्याने कैद्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विविध तपासण्या करणे महत्वाचे
कारागृहात दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढते आहे. त्यातच काही कैद्यांना आजाराची बाधा उदभवलेली आहे. अशा कैद्यांवर तत्काळ उपचार केला गेल्यास इन्फेक्शन टाळता येणे शक्य होईल. मधुमेह, (रक्तदाब), हदयविकार, दमा,फ्रॅक्चर या आजारांशी काही कैद्यांना सामना करावा लागतो आहे. अनेक कैदी निरीक्षक आणि अज्ञानी आहेत. त्यामुळे ते शरीरातील आजारांकडे फारसे लक्ष देत नाहीत, किंवा तक्रार करत नाहीत. त्यामुळे प्रकृती खालावून कैदी अत्यवस्थ होतो. यासाठी पंधरा दिवसांनी सर्व कैद्यांची आरेाग्य तपासणी नियमित करणे आवश्यक आहे. परंतु तसे होत असल्याचे दिसत नाही. अनेक संशयित कैदी हे न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारावासात वास्तव्यास असतात. हे कैदी न्यायालयाच्या अखत्यारीतील असतात. त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असते. प्राप्त माहितीनुसार सध्या कारागृहात मधुमेहाचे दहा ते बारा कैदी आहेत. तर हदयविकाराचे तीन ते चार, फ्रॅक्चर तीन कैदी आहेत. या रूग्णांना सिव्हीलमध्ये जेल प्रशासनाने उपचारार्थ रवाना केल्यास त्यांना नेमका कोणता आजार ,त्याच्यावर योग्य तो उपचार कसा केला जाईल यासाठी प्रारंभी कैद्यांच्या विविध तपासण्या करणे आवश्यक असते. उदऱक्त ,लघवी, फोटो काढणे इत्यादी. परंतु अशा तपासण्याकडे कानाडोळा करून कैदयाला काय त्रास होतोय, अशी विचारणा करून त्याला औषधीच्या गोळया देऊन पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात येते. यामुळे कैद्यांच्या मुळ आजाराचे निदान होत नाही. सिव्हील प्रशासन कैद्यांबाबत उदासिन असल्याचे वास्तव त्यामुळे समोर आले असून कैद्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृहात संशयीत महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. या महिलांसोबत काही लहान बालकेही असतात. बॅरेकमध्ये जाऊन महिलांची तपासणी होत नसल्याचे सांगीतले जात आहे. कारागृहात त्वचारोगाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावरही उपचार होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.