चूक रेल्वे प्रशासनाची शिक्षा मात्र रेल्वे लोकोपायलटला -मोर्चेकर्यांचा संताप
भुसावळ– रेल्वे लोकोपायलटवर होणार्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सीआरएमएस संघटनेतर्फे गुरुवारी दुपारी डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने डीआरएम कार्यालयाचा परीसर दणाणला. रेल्वे प्रशासनाच्या चुकीचा त्रास लोकोपायलट यांना होत असल्याची भावना मांडण्यात आली. डीआरएम आर.के. यादव यांना शिष्ठ मंडळाने निवेदन दिले. यावेळी डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोर्चा अडविण्यात आला. 31 जानेवारी 2018 रोजी गीतांजली एक्स्प्रेस (12860) या गाडीचे लोको पायलट व सहायक लोको पायलट यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकवरील स्टार्टर सिग्नल पार केल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. गाडी प्लॅटफॉर्मवर 10.37 मिनिटांनी आली तर गाडीला अगोदरच 10.33 वाजता सिग्नल दिला गेला होता. हे नियमाच्या विरूध्द आहे तसेच सिग्नल पॅनल रूममध्येही दुरस्तीचे काम सुरू आहे. अन्य कर्मचार्यांना वाचविण्यासाठी लोको पायलट यांचा बळी घेतला जात आहे, असा आरोप संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला. बी.के. सोनी, ए.के. तिवारी व एस.एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात नंदकिशोर उपाध्याय, आर.के. माघवल, एस.के. दुबे, दीपक शर्मा आदी उपस्थित होते. मोर्चा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तीन वरील लॉबीतून निघाला.