सीईओंनी पहिल्याच भेटीत झापले!

0

शिरपूर। पंचायत समितीतील अधिकारी व ग्रामसेवकांनी यापूर्वी काय कामे केले ते सांगू नका, आता यापुढे क्वॉलीटीची कामे तातडीने करा, असे सांगत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डी गंगाथरण यांनी येथील पंचायत समितीच्या पहिल्याच भेटीतच सार्यांना धारेवर घेतले. कामे करणार नसाल तर राजीनामा द्या तसेच क्वॉलिटीशिवाय ठेकेदारांनी बीले न काढण्याच्या सूचना त्यांनी येथील पंचायत समितीच्या आमदार अमरीशभाई पटेल सभागृहात झालेल्या बैठकीत दिल्या. येथील पंचायत समितीच्या सभागृहात नुकतेच रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाथरण यांनी पहिल्यांदाच भेट दिली. त्यांनी सर्वच विभागाचा आढावा घेतला.

बांधकाम विभागातील कामे निकृष्ट!
अधिकारी, कर्मचारी कामे करणार नसाल तर राजीनामा द्या, अधिकार्यांसह विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांचे कामे फारसे दिसत नाही. कामे करणार आहे की नाही? असा सज्जड दम देत येत्या जून अखेर उर्वरीत सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्यात. बांधकाम विभागातील कामे निकृष्ट होत आहेत. यापुढे अशी कामे करणार्‍या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यात येईल तसेच त्यांची बिले न काढण्याच्या सूचना दिल्यात. क्वॉलिटी चांगली असेल तरच बिले काढण्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने तातडीने घरकुल, शौचालयांची कामे पूर्ण न केल्यास त्यांना 14 वा वित्त आयोगाचा निधी वापरता येणार नाही. सरपंच व ग्रामसेवकांनी ही कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्यात. पाणी टंचाई असलेल्या ग्रामपंचायतींनी त्वरीत विहिर अधिग्रहण करण्याचे सांगितले.

कामे तुम्हीच करता, मग उशीर का?
बांधकाम विभागाने घरकुलाकरीता लाईन आऊट देण्यासाठी का विलंब करतात, कामे तुम्हालाच करावी लागतात मग का उशिर लावतात, दुसरा मनुष्य तेथे कामाला येणार नाही असे सांगत या आठवड्यापर्यंत उर्वरीत कामांना लाईन आऊट देण्याच्या सूचना केल्यात. कामे न करणार्‍या लाभार्थ्यांना देखील कारवाईच्या नोटीस पाठविण्याच्या सूचना बीडीओंना देण्यात आल्यात. वरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असतांना परंतु जागा मोजमापाकरीता सीटी सर्व्हे कार्यालयात 53 हजार रूपये फी न भरल्यामुळे ते काम रखडले आहे.येत्या आठवड्यापर्यंत वसुली करून ते पैसे भरण्याच्या सूचना गंगाथरण यांनी दिल्या. थाळनेर व गिधाडे येथे देखील प्राथमिक आरोग्य मंजूर झाले आहे. पैसे न भरल्यामुळे जागा मोजमाप करण्याचे काम रखडले आहे. दोन्ही केंद्राचे मोजमाप करण्याविषयी त्यांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी खुर्ची सोडून कामे करावी
लघुसिंचन व बांधकाम विभागातील अधिकार्यांनी खुर्ची सोडून कामे केली पाहिजेत. फक्त ठेकेदारांची बीले काढण्यात खूष राहू नका. लघुसिंचन विभागाने या महिन्यात किमान 50 कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. स्वच्छता अभियानाची कामे देखील सुरू करा, पण ते कामे क्वॉलिटीची असायला हवीत. जलयुक्त शिवाराच्या कामांना लाईन आऊट देवून तातडीने पुन्हा कामे सुरू करा. रोजगार हमी योजनेची कामे फारसे सुरू झालेली दिसत नाही. जून अखेर कामे पूर्ण करा, नंतर पावसाळा सुरू होईल. गेल्या पंधरवाड्यात दोन ग्रामसेवकांना निलंबीत केल्यामुळे येथील ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलन केले. निलंबीत केल्यावर किमान 50 टक्के पगार मिळतो, यापुढे असा संप करून पहा मग दाखवितो असा सज्जड धम दिला.

अधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी उपसभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी एम.डी.बागुल, सहाय्यक बी.डी.ओ. शरद कासार, बांधकाम उपअभियंता सी.पी.खैरणार, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता हितेश भटुरकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रताप पावरा, कृषी अधिकारी भरत कोळेकर, डॉ.वाडीले आदी उपस्थित होते. सीईओ पहिल्यांदाच शिरपूर पंचायत समितीला भेट देणार असल्यामुळे सारे चकाचक करण्यात आले होते. विशेषत: अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सार्यांनी गळ्यात ओळखपत्र टाकले होते तसेच कर्मचारी देखील गणवेशात होते.