लखनऊः सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांची तुलना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विषाणू सोबत केली आहे. कोरोना विषाणू हा मानवतेचा शत्रू आहे. हा माणसातूनच पसरतोय. हा स्वार्थासाठी जाळपोळ आणि तोडफोड करून मानवी मूल्यांवर हल्ला करतोय. त्यांची अनैतिक कृत्य रोखली की ते दुसरा चेहरा घेऊन उभे ठाकतात. कोरोना आणि होर्डींगवर असलेल्या हिंसाचार करणाऱ्यांचे चेहरे हे दोन्ही समाजासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.
सीएएविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांचे होर्डींग हे उत्तर प्रदेशात लावण्यात आले होते. हे होर्डींग काढण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यावरून योगी आदित्यनाथ यांनी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केलं. होर्डींगवरील चेहरे बघा. स्वयंसेवी संस्था किंवा इतर संस्थेच्या नावाने मानवतेचे पाठ देणारे बघा काय करत आहेत. त्यांचं खरं काम बघितलं तर ते मानवतेचे सर्वांत मोठे शत्रू असल्याचं समोर येतं. जनतेने खऱ्या शत्रूंना ओळखण्याची गरज आहे. यामुळे अशा व्हायरसपासून बचाव करता येईल, असं आदित्यनाथ म्हणाले.
होर्डींग लावून कुणाची प्रतिमा मलिन झाली नाही. तर हिंसा करणारे हे चेहरे मीडियातून जनतेपर्यंत आधीच पोहोचले आहेत. त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही. तेच समाजासाठी धोकादायक बनले आहेत. याचे ठोस पुरावेही आहेत. सीएएविरोधी हिंसाचारात पोलिसाच्या गोळीने कुणीच ठार झाले नसून ते आपल्याच गोळीने ठार झाले, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.