सीएम चषक स्पर्धा चाळीसगाव: चित्रकला स्पर्धेत अडीच हजार स्पर्धकांचा सहभाग

0

चाळीसगाव – राज्यात सुमारे २८८ तालुक्यामध्ये कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत विविध ठिकाणी सीएम चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातही दोन दिवसांपासून रांगोळी स्पर्धा घेतली जात आहे. यात दहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. आज झालेल्या चित्रकला स्पर्धेसाठी शहरातील व्ही.एच.पटेल शाळेत विद्यार्थ्यांनी अक्षरशः गर्दी केली होती. यात अडीच हजार स्पर्धक सहभागी झाले. आमदार उन्मेष पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे सखोल नियोजनामुळे चाळीसगाव तालुका सीएम चषक स्पर्धेत राज्यात टॉप १० कडे वाटचाल करीत आहे.

विद्यार्थ्यानी एकापेक्षा एक कल्पना कागदावर उतरवत आपल्या प्रतिभेची साक्ष दिली असल्याची प्रतिक्रिया परीक्षक व शहरातील ख्यातनाम चित्रकार धर्मराज खैरनार यांनी जनशक्तिशी बोलताना दिली. सीएम चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास होणार आहे असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेत लहान थोरांचा सहभाग
आजच्या चित्रकला स्पर्धेला साडेतीन वर्षाचा वरद अहिरराव पासून ६० वर्षांचे नंदू शुक्ल सहभागी झाले होते. तसेच मीनाक्षी दत्तू चौधरी या दीव्यांग भगिनी हिने एका हाताने चित्र रेखाटत कौतुकाची थाप मिळविली. पालकांनी देखील चित्रे काढली. भारती नागेश मराठे व मनीषा मालपुरे या गृहिणींची तयारी लक्षवेधी ठरली. स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.

आमदार ‘पती – पत्नी’ रमले
सकाळी दहा वाजता चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. तेव्हापासून आमदार उन्मेष पाटील व त्यांच्या पत्नी उमंग परिवाराच्या आधारस्तंभ संपदा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा उत्साह वाढविला. आमदार पती-पत्नी यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यावेळी स्पर्धा समन्वयक सचिन पवार, नगरसेवक अरुण अहिरे, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, बंडू पगार, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय मराठे, कपिल पाटील, अमोल नानकर, फैय्याज शेख, पी.एन.पाटील, शिवराज पाटील, हर्षल चौधरी, शुभम पाटील, शिवा मराठे, केतन पाटील, रवी मोरे, पी डी वाघ, अनिल शिंदे, परीक्षक मनोज पाटील, योगेश कोठावदे, सारंग जाधव, जितेंद्र गावडे, योगेश पवार, यांच्या सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.