सीडीआर प्रकरणात आता 13 वा आरोपी अटकेत

0

ठाणे । बेकायदेशीर सीडीआर काढल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने तब्बल 12 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस पथकाने आता आणखी एक गुप्तहेर जिग्नेश छेडाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सीडीआर काढल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 12 जणांना अटक केली होती. त्यात 2 पोलीस आणि गुप्तहेर यांच्याशी संबंधित आरोपींचा समावेश होता. त्यापैकी 6 आरोपींना आतापर्यंत जामीन मंजूर झाला आहे. पण, आता छेडाच्या अटकेनंतर हा आकडा 13 वर गेला आहे. गुन्हे शाखेने जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफचा जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिग्नेशने अनेक सीडीआर काढल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या 12 आरोपींकडून हस्तगत केलेल्या सीडीआरचे तपासणी करण्यात आली. त्यानंतर हे सीडीआर कुणी आणि कुणासाठी काढले होते आणि कुणाला देण्यात आले? याचा खुलासा झाल्याने पोलीस पथकाने महिला गुप्तहेर रजनी पंडितसह अनेकांना अटक केली. यात सीडीआर काढण्यासाठी यवतमाळ अधीक्षक यांच्या कार्यालयात काम करणारा पोलीस शिपाई नितीन खवडे आणि आसाम येथूनही सीडीआर काढल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आसाम पोलिसांनी दास नावाच्या पोलीस शिपायाला अटक केली.

284 सीडीआरचे अ‍ॅनालिसिस
सीडीआरच्या खुलाशात बॉलिवूडमधील अनेक लोकांच्या सीडीआरचा समावेश आढळला. सीडीआर काढून पाठवल्याच्या प्रकरणामुळे नावाजुद्दीन सिद्धिकी याचा वकील रिजवान सिद्धिकी हाही वादाच्या भोवर्‍यात अडकला असून, ठाणे पोलिसांनी त्यालाही अटक केली. मात्र, त्याची उच्च न्यायलयाने सुटका केली. तब्बल 284 सीडीआरचे अ‍ॅनालिसिस करण्यात आल्याने अनेकांची नावे समोर येण्याची चिन्ह आहेत. सीडीआर प्रकरणात आता 13 वा आरोपी गुप्तहेर जिग्नेश छेडा याच्या नावाचा खुलासा झाल्याने ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली.

17 पर्यंत पोलीस कोठडी
जिग्नेश छेडा हा खासगी डिटेक्टिव्ह आहे. त्याने अनेक कॉर्पोरेट आणि बॉलिवूडमधील लोकांचे सीडीआर काढल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. त्याच्या चौकशीत आणखीन माहिती बाहेर येणार आहे. ठाणे पोलिसांनी छेडा याला न्यायलयात हजर केल्यानंतर न्यायलयाने त्याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आयशा श्रॉफ हिचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवला असून, अजून चौकशीची प्रक्रिया शिल्लक असल्याची माहिती गुन्हे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.