नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर आरबीआय गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला तर स्वायत्त संस्थेत हस्तक्षेप करण्याचे मोदी सरकारचे धोरण कायम असल्याचे स्पष्ट होईल.आधी सीबीआय, आता आरबीआयची बारी, अशा शब्दात ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे.
स्वायत्ततेच्या प्रश्नावरून रिझव्र्ह बँक आणि केंद्र सरकारयांच्यात तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अरुण जेटलींनी आरबीआयवर निशाणा साधला होता. २००८ ते २०१४ दरम्यान, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. या टीकेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उर्जित पटेल हे राजीनामा देणार, अशी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि एकच खळबळ उडाली आहे.