सीबीआय अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करणार – अरुण जेटली

0

नवी दिल्ली:‘सीबीआयमध्ये सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत,’असं सांगतानाच या अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्रीय दक्षता आयोगाला या चौकशीचे अधिकार असल्याने केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार सीबीआय अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं.

केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना पदावरून हटवले आहे. या अधिकाऱ्यांना हटवण्याचे केंद्र सरकारला अधिकार नसून सरकार याप्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर आलोक वर्मा यांनी त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. विरोधकांच्या आरोपात तथ्य नसून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. तसंच या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.