सीबीआय वाद: आलोक वर्मा यांना रजेवर पाठविल्याने सरन्यायाधीशांनी केंद्राला सुनावले

0

नवी दिल्ली – सीबीआयमधील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारला चांगलेच सुनावले. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार तातडीने काढून घेत त्यांना रजेवर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आलोक वर्मांचे अधिकार काढून घेण्यापूर्वी निवड समितीचे मत विचारात का घेतले गेले नाही, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि क्रमांक दोनचे अधिकारी राजेश अस्थाना यांच्यातीला वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करून आलोक वर्मा यांचे अधिकार काढून घेत त्यांना रजेवर पाठवले होते. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवर आज सरन्यायाधीशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ”सीबीआयमधील या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद हा काही एका दिवसात सुरू झालेला नसेल. मग सरकारने आलोक वर्मा यांचे अधिकार निवड समितीचा सल्ला न घेता अचानक कसे काय काढून घेतले?” अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली.