शिरपूर । महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर गावठी पिस्तुलाची तस्करी होत असल्याची खबर वरिष्ठांकडून मिळाल्यानंतर त्या माहितीचे गांभीर्य ओळखून थाळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि किरणकुमार खेडकर यांनी काल हाडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचला. भर उन्हात संशयीताची वाट पहातांना पोलिसांना घामही फुटला तरीही मागे न हटता त्यांनी चेक नाक्यावरुन जाणार्या-येणार्यांवर लक्ष ठेवले. त्यातून एक संशयीत केवळ हातीच लागला नाही तर त्याचेजवळून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली.या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुकही होत आहे.
असा आवळला पाश..
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशच्या सिमेवर गावठी पिस्तुलांची तस्करी होत असल्याची गुप्त खबर अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकातील पो.कॉ.राहुल सानप यांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पो.कॉ.राहुल सानप यांनी वरिष्ठांसह थाळनेरचे सपोनि किरणकुमार खेडकर यांना ही माहिती सांगितली. खेडकर यांनी राहुल सानपसह हे.कॉ.योगेश शिरसाठ, पो.कॉ.संजय जाधव, मच्छिंद्र पाटील, योगेश दाभाडे, राजू गिते, पो.ना.संजीव जाधव यांना सोबत घेवून हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा रचला. दुपारच्या भर उन्हात हे पथक बारकाईने लक्ष ठेवून होते. दुपारी 4 च्या सुमारास एमएच 18/एआर 1436 या मोटरसायकलवरुन जाणार्या तरुणाचा संशय आल्याने पोलिसांनी हळूच त्याच्याभोवती पाश आवळला. आणि हा तरुण अलगद पोलिसांच्या हाती लागला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळील प्लास्टिक पिशवीत दोन गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आढळून आले. या पिस्तुलाची किंमत प्रत्येकी दहा हजार रुपये असून 30 हजार रुपयाच्या मोटरसायकलसह पिस्तूल मिळून 50 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
तस्कर शोधण्यासाठी वरिष्ठांचे प्रोत्साहन
याप्रकरणी थाळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून शिताफीने गावठी पिस्तुलांसह ताब्यात घेतलेल्या तरुणाची अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव विजय रमेश पावरा असल्याचे सांगितले. तो शिरपूर तालुक्यातीलच दुरबळ्या येथील रहिवासी आहे. त्याच्या माध्यमातून गावठी पिस्तुलाची तस्करी करणारी टोळी हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईचे वरिष्ठांकडून कौतुक होत असून तस्करांची टोळी हडकून काढण्या साठी प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.