सीमा तपासणी नाका चुकवल्याने तिघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ । मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड सीमा शुल्क तपासणी नाक्यावरुन अधिक भार असताना ट्रक (क्र.एच.आर.डब्ल्यू.4263) ने शासनाची फसवणूक करीत नाका ओलांडल्याप्रकरणी तसेच ट्रक सोडण्यासाठी अनधिकृतरित्या दोन हजार 200 रुपये स्वीकारल्या प्रकरणी पंटरासह अन्य दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

6 सप्टेंबर रोजी सकाळी 8:20 मिनिटांच्या सुमारास वरील ट्रक बर्‍हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे पुरनाड सीमा शुल्क तपासणी नाका चुकवून जात असतांना सद्भभावना कंपनीचे सुरक्षा रक्षक रवींद्र रुपसिंग कठोरे हे ट्रकमागे होते. मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ट्रक थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रक न थांबता निघून गेल्याने शासनाचे उत्पन्न बुडाले. या प्रकरणी चालक मोहम्मद खालीद मजीद (रा.मेवली, ता.जि.नुहु, हरियाणा) यास ट्रकसह ताब्यात घेतले. त्याने मुकेश घटे (रा.पुरनाड) यास दोन हजार 200 रुपये देऊन वाहन पास केल्याची माहिती दिल्याने त्याच्यासह मुकेश घटे व सुरक्षा रक्षक रवींद्र कठोरेविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत कडुकार करीत आहेत.