नवी सांगवी : शिक्षकदिनानिमित्त लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बालवाडी गटातून दुर्गा बाल विद्यामंदिरच्या सीमा भोसले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सीमा भोसले या 2008 पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडीमध्ये शिक्षिका आहे. त्या सध्या चर्होली बुद्रुक येथे कार्यरत असून त्यांचे लहान मुलांसाठीचे कार्य गौरवास्पद आहे. सर्व बालवाडीच्या पालकवर्गात व बालचमूमध्ये त्या लोकप्रिय आहेत. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्या मुलांमध्ये शिक्षणाविषयीची गोडी निर्माण करण्याचे काम करत आहेत. गावच्या निर्मल ग्राममध्ये ही त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या सतत राबवत असतात. या सर्वांची नोंद पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेऊन त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, शिक्षण मंडळ सभापती सोनाली गव्हाणे, नगरसेविका विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, अश्विनी चिंचवडे उपस्थित होते.