सीमा सध्या काय करतेय?

0

सौदी मूळची पाकिस्तानची असलेली पण वास्तव्यासाठी दुबईत असलेल्या नाजिया आमिन मुहम्मद या प्रसिद्ध गायिकेनंदेखील हेच दाखवून दिलं की, संगीताला कोणतीच सीमा नसते. नाजियाने अजय-अतुलनं जोगवा या मराठी चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं जीव रंगला हे गाणं गायलं. त्या गाण्याचा व्हिडिओ बनवून तिनं तो सोशल मीडियात अपलोडही केला आणि बघता बघता नाजियाच्या चाहत्यांनी तो व्हिडिओ डोक्यावर घेतला. अवघ्या एका दिवसात जवळपास चार हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि काही तासांतच अजय-अतुलचं जीव रंगला हे गाणं पुन्हा एकदा जगप्रसिद्ध झालं. नाजियानं ते गाणं गाण्यापूर्वी जे म्हटलंय ते खरोखरंच प्रचंड मार्मिक आहे. नाजियाच्या म्हणण्यानुसार, संगीताला कोणत्याच सीमा नसतात. खरंतर कोणत्याच कलेला कोणतीच सीमा नसते! कारण कला वैश्‍विक असते. गुलाम अलींच्या गझलांचे भारतातील करोडो चाहते याचा पुरावा आहेत. फाळणीनंतर ताटातूट झालेल्या जीवलग मैत्रिणीशी ट्रंककॉल बूक करून ख्याली-खुशाली विचारणारी लता मंगेशकर आणि नूरजहाँची घट्ट मैत्री याचा जिवंत पुरावा आहे. गालिब या तीन अक्षरांनी अवघ्या जगाला आपलंसं केलंय. अशी अनेक उदाहरणं देता येतील, ज्यांनी आपल्या कलेच्या जोरावर मैत्रीचे पूल बांधून ठेवलेत… पण आज हा मैत्रीचा साकव थरथरू लागलाय. हा साकव कोसळण्यापूर्वी आपल्यालाच तो सावरावा लागणार आहे.

सीमा सध्या काय करतेय? याचं उत्तर आहे, सीमा सध्या युद्ध जगतंय. आज जगातल्या प्रत्येक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. प्रत्येक देश आपल्या शेजारील राष्ट्रांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय. यात दोन्ही देशांचे सैनिक मारले जाताहेत. दोन महायुद्ध भोगलेल्या या जगाची युद्धाची भूक का भागत नाहीय? भारत आज चीन-पाकिस्तान या दोन्ही देशांशी युद्ध करण्यासाठी सज्ज आहे किंवा असंही म्हणता येईल की, या दोन्ही देशांना भारतासोबत युद्ध करायचंय. पण ही इच्छा या तिन्ही देशांतील सामान्य जनतेची निश्‍चितच नाहीय. जगातील कुठल्याही सामान्य जनतेला युद्ध नकोय! त्यांना शांतीच हवीय! मूठभर राजकारण्यांच्या राजकीय इच्छाशक्तिंमुळे ते सीमांना युद्धाच्या दरीत लोटताहेत… क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टी उखडणे, हे या सीमाद्वेषाचं प्रमुख उदाहरण आहे. या उदाहरणानंतरच जगभरातील कलाकारांना सीमेच्या कुंपणात अडकवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. अफसोस, हे प्रयत्न आजही सुरू आहेत.

मलाला युसूफ या पाकिस्तानी मुलीनं स्वत:च्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी डोक्यात गोळ्या झेलल्यात. आज मलाला तिच्या देशासोबतच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जीवाचं रान करतेय. नोबेल पारितोषिकाने तिच्या पंखांना बळ दिलंय, हे खरंय! पण तिची जंग काही अद्याप संपलेली नाहीय. मलालाच्या लढाईत सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे. मैत्रीचा जो वैश्‍विक साकव थरथरतोय, त्याला मजबूत करण्याची हीच ती वेळ आहे. या कार्यातील नाजियानं तिचा वाटा उचलला आहे. आता आवश्यकता आहे ती, मूठभर राजकारण्यांच्या धूर्त राजकीय इच्छाशक्तीला बळी न पडता या कार्यातील स्वत:चा वाटा उचलण्याची…!
नाजियाला मुबारकबाद …! आणि माझ्यासह सर्वांना
राकेश शिर्के- 9867456984