सीमेपलीकडचे हॅम्लेट

0

एखाद्या माणसाला संशयपिशाच्चाची बाधा झाली, की ती उतरणे महामुश्किल. हे संशयपिशाच्च भल्या-भल्या माणसांच्या आयुष्याची कशी फरपट करते, हे थोर नाटककार शेक्सपिअरने त्याच्या हॅम्लेट या नाटकातून दाखवून दिले आहे. असे हॅम्लेट केवळ नाटक, कादंबर्‍या किंवा परिकथेत नसतात. ते सर्व काळात असतात. मूलतः ती एक प्रवृत्ती असते. पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करात ही प्रवृत्ती मुरलेली असल्याने या हॅम्लेटचा त्रास आपण गेली सात दशके भोगतो आहोत. पाक सैन्याने नुकत्याच केलेल्या हल्ल्यांमागे अशाच संशयपिशाच्चाचा मोठा हात आहे. पण आता आपण समजतो आहोत, त्या पलीकडे हा गुंता गेला आहे. त्याचे आकलन जोपर्यंत आपण करून घेणार नाही, तोपर्यंत हा गुंता कसा सोडवायचा, याचेही उत्तर मिळणार नाही.

पनामा पेपर्स प्रकरणात अडकलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भारतीय उद्योजक सज्जन जिंदाल यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीवरून पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पाक सैन्यातही त्याबाबत नाराजी आहे. शरीफ- जिंदाल भेट नेमकी कशासाठी झाली आणि त्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचे तपशील बाहेर आलेले नाहीत. जिंदाल यांचे शरीफ यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, व्यापार-उदिमाच्या हेतूनेच या दोघांची भेट झाल्याचा खुलासा शरीफ कुटुंबीयांनी केला असला, तरी त्यावर पाकिस्तानातले शेंबडे पोरही विश्‍वास ठेवण्यास तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सांगावा घेऊनच जिंदाल यांनी शरीफ यांची भेट घेतल्याचा संशय पाक सैन्याला आहे. त्यातूनच पाक सैन्य सीमेवर कुरापती काढते आहे. कारगिलची द्विरुक्ती अशा प्रकरणांतून करून पाक सैन्य तेथील राजकारण्यांना पुन्हा इशारा देऊ लागले आहे, हा या ताज्या कुरापतींचा एक अर्थ आहे.

यातील दुसरा अधिक गंभीर कंगोरा अद्याप कोणी लक्षातच घेत नाही. हा कंगोरा आहे चीनचा. चीनने पाकिस्तानात फार मोठी गुंतवणूक केली आहे. गिलगिट, बाल्टीस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये चीनने अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. चीनचा शिनजियांग प्रांत आणि पाकला जोडणारा हा सर्व भूभाग भारताचा भाग आहे. तसा ठराव आपल्या संसदेत एकमताने संमत झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने ही भूमिका वारंवार मांडली आहे. पाकिस्तानने मात्र हा वादग्रस्त भाग असल्याचे टुमणे सतत लावले आहे. हाच प्रदेश सध्या कमालीचा अस्थिर बनला असून, चीनच्या गुंतवणुकीवरच त्यामुळे प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यानेही चीन अधिक सावध झाला आहे.

काश्मीर प्रश्‍नात हस्तक्षेपाची संधी अमेरिका, रशिया, ब्रिटन वारंवार शोधत आहेत. मात्र, भारताने या देशांना अद्याप तशी संधी मिळू दिलेली नाही. आता चीनही त्यात उतरू पाहतो आहे. धोका आहे तो नेमका हाच. अमेरिका, रशिया, ब्रिटनसाठी पाकिस्तानचा भूभाग सामरिक व व्यूहतंत्रात्मकदृष्ट्या महत्त्वाचा होता. चीनची गोष्ट वेगळी आहे. चीनचे अर्थकारण या भूभागात गुंतले आहे. गिलगिट, बाल्टीस्तानात चीनच्या प्रकल्पांना विरोध वाढतो आहे. पण एका टप्प्यापलीकडे तेथे दडपशाही करता येणार नाही, याची जाणीव असल्यानेही चीन अस्वस्थ झाला आहे. येनकेनप्रकारेण चीनला काश्मीर प्रश्‍नात हस्तक्षेपाची संधी हवी आहे आणि तशी ती मिळावी म्हणून चीन कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. अगदी पाक सैन्यावरही तो प्रसंगी कमालीचा दबाव आणू शकतो. चीनचे अधिकृत माध्यम समजल्या जाणार्‍या ग्लोबल टाईम्सने मंगळवारी चीनची मनीषा व्यक्त केली आहे.

चीनचे हे मनसुबे फलद्रुप होण्यात प्रमुख अडसर आहे तो सिमला कराराचा. या करारानुसार काश्मीर प्रश्‍नात कोणत्याही तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेपास मनाई आहे आणि भारत या तरतुदीचे सातत्याने पालन करत आला आहे. पाकिस्तानने हा करारच धुडकावून लावण्याची भूमिका घेतली असली, तरी पाकिस्तानलाही या कराराचे पालन करावेच लागते आहे. चीन आणि पाकिस्तानचे दुखणे आहे ते हेच. या प्रश्‍नात चीनला शिरकाव करू देण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचा मार्ग म्हणून पाक सैन्य सीमेवर सातत्याने कुरापती काढत असून, क्रौर्याची परिसीमा गाठते आहे. त्यातून भारताचा संयम संपेल, अशी आशा पाक सैन्याला वाटते आहे.

काश्मीर प्रश्‍नात भारत पाक सैन्याशी कधीही चर्चा करणार नाही, हेही पाक सैन्याला पुरते ठाऊक आहे. त्यामुळेही पाकिस्तानातील कोणत्याच राजकीय नेतृत्वाशी भारताने चर्चा करणे पाक सैन्याला मंजूर नसते. जिंदाल- शरीफ भेटीवर पाक सैन्याने घेतलेला आक्षेप या भूमिकेला अनुसरूनच आहे. जिंदाल- शरीफ भेटीने बॅक डोअर डिप्लोमसीला वाव मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाक सैन्याने तातडीने सीमेवर तणाव निर्माण केला आहे. त्या पाठोपाठ चीनने काश्मीर प्रश्‍नात हस्तक्षेपाची भूमिका मांडणे म्हणूनच अधिक चिंताजनक आहे. सीमेपलीकडच्या या हॅम्लेटच्या कारवायांमागचा खरा हेतू आहे तो हा. हे कंगोरे लक्षात घेऊन आणि भावनावेगात वाहून न जाता आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे.