सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण नेहरू, इंदिरा गांधी राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही: संजय राऊत

0

मुंबई:- भारत-चीन सैन्य दलांमध्ये सोमवारी संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या विषयी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भूमिका मांडली. “सीमेवर जे घडले, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही,” असं मत त्यांनी मांडले आहे.

भारत-चीन दरम्यान सोमवारी रात्री सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला. त्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने या चकमकींनाही मोठे महत्त्व आहे. १४ हजार फूट उंचीवरच्या या भागात गलवाण नजीक ही धुमश्चक्री झाली. या घटनेवरून देशातील राजकारण तापलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करूनही काही प्रश्न केंद्र सरकारला विचारले आहेत. “चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले २० जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीन भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचं आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात… तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद,” असं ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचं आवाहन केलं आहे.