एरंडोल । प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय जवान सीमेवर रक्षण करीत आहेत, सर्व भारतीय जवानांचा देशाला अभिमान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा लक्ष फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा देसाई यांनी केले. दीपस्तंभ, आर्यन फौंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था आणि विवेकानंद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या अखेरच्या पुष्पात त्या बोलत होत्या. काबरे विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय व्याख्यान मालेचा हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी अनुराधा देसाई यांनी भारतीय जवानांनी प्रत्येक युद्धात मिळवलेल्या यशाची सविस्तर माहिती दिली.
शहीद जवानांची नावे लक्षात नसल्याची मान्यवरांची खंत
सिनेअभिनेत्यांची नावे तरुणांना माहित आहेत, मात्र अतिरेक्यांशी लढतांना तसेच शत्रूशी लढतांना शहीद झालेल्या जवानांची नावे तरुणांना माहित नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारतीय जवानांच्या बलिदानामुळे तसेच त्यागामुळे देशातील नागरिक आपला कौटुंबिक आनंद घेत आहेत.जवान आपल्या परिवारापासून हजारो किलोमीटर दूर राहून देशाचे संरक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जवानाचा अभिमान वाटला पाहिजे, असे कार्य ते करीत आहेत. स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता जवान शत्रूंशी लढत असतात. हजारो जवानांनी तरुणपणीच देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यामुळे सर्व जवानांच्या कार्याला सलाम करून त्यांचा अभिमान देशातील सर्व नागरिकांनी कायम स्मरणात ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
दीपस्तंभचे संचालक प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांचा योगेश्वर सन्मान पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी प्रास्तविक केले. जान्हवी महाजन यांनी सुत्रसंचलन केले तर समृद्धी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास गुरुनाथ देसाई, चित्रा पुराणिक, नगरसेविका जयश्री पाटील, छाया दाभाडे, डॉ.रवी महाजन, डॉ.नितीन राठी यांचेसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील अनेक पदाधिकार्यांनी दीपस्तंभच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवीत असलेल्या उपक्रमास आर्थिक मदत केली.
युद्धातील जवानांचा सत्कार
यावेळी तीस वर्षापूर्वी श्रीलंकेत शहीद झालेले शांतीसेनेतील जवान राजेंद्र ठाकरे यांचे वडील धनजी ठाकरे व आई साखरबाई ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 1962 व 1965 च्या युद्धात सहभागी झालेले जवान घन:शाम महाजन, आसाममध्ये नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेले निवृत्त जवान दगडू पाटील, श्रीनगर येथे कार्यरत असलेले दत्तात्रय पाटील, प्रशांत देवरे या जवानांचा देखील सत्कार करण्यात आला.