पुणे । महत्त्वाचे चौक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आता सीसीटीव्हींचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाशी चर्चा करण्यात आली असून पालिकेस आवश्यक चौक तसेच रस्त्यांचे ऑनलाइन सीसीटीव्ही फुटेज देण्यास सहमती दर्शविण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केलेल्या आणि वर्दळीच्या रस्त्यांवर पथारी व्यावसायिक तसेच इतर होणार्या अतिक्रमणांवर लक्ष ठेवून तातडीने कारवाई करणे शक्य होणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा
शहरात वाहनांची संख्या वाढल्याने गेल्या काही वर्षात वाहतुकीसाठी रस्ते कमी पडत आहेत. त्यातच अतिक्रमणे होत असल्याने नागरिकांणा वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर महापालिकेकडेही या रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने पालिकेस कारवाईत अडथळे येतात. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने शहरातील सुमारे 45 रस्ते आणि तब्बल 153 चौक नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केलेले आहेत. मात्र, त्यानंतरही या रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा कायम आहे.
अतिक्रमण दिसताच होणार कारवाई
पालिकेला संपूर्ण शहरात एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे महापालिका कारवाई करून पुढे जाताच, संबधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होतात. ही बाब लक्षात घेऊन आता प्रशासनाकडून अतिक्रमण झाल्याचे दिसताच ते तातडीने काढण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. मात्र, त्यासाठी एकाच वेळी शहरात होणार्या या अतिक्रमणांची माहिती मिळावी, यासाठी पालिकेने शहरातील सुमारे 300 हून अधिक चौकात बसविण्यात आलेल्या या सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वतंत्र कक्ष उभारणार
पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून शहरात बसविण्यात आलेल्या या सीसीटीव्हीचे फुटेज सध्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता अतिक्रमण विभागाकडूनही स्वतंत्र कक्ष केला जाणार आहे. त्यात महापालिकेने नो हॉकर्स झोन रस्ते आणि चौकांमधील सीसीटीव्हीचे ऑनलाइन फुटेज घेण्यात येणार आहे. तसेच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारीही तैनात केले जाणार आहे. त्यामुळे या यंत्रणेस अतिक्रमण झाल्याचे दिसताच तातडीने संबधित चौकातील अतिक्रमण काढून वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.