सुकन्या समृध्दी योजनेसाठी टपाल विभागाची विशेष मोहिम

0

चाळीसगाव – टपाल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत नवीन खाते उघडण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत चाळीसगाव मुख्य टपाल कार्यालयात 1 सप्टेंबर 2018 पासून नवीन खाते उघडण्यासाठी स्वतंत्र काऊंन्टर सुरु करण्यात आले आहे. स्वतंत्र काऊंन्टरमुळे खाते उघडतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लागलीच सोडविता येत असल्याने खाते लगेच उघडण्यात येतात. या काऊंन्टरची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे. अशी माहिती चाळीसगाव मुख्य टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर यांनी दिली आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलीच्या भवितव्याबाबत चिंतीत असतो. आपल्या मुलीने खुप शिकावे यासाठी तिच्या शिक्षणाकडे लक्ष देतो. तसेच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सुरवातीपासून पैसे जमा करीत असतो. जमा केलेला पैसा वेळोवेळी सुरक्षित रहावा, यासाठी काळजी घेत असतो. यासाठी केंद्र शासनाची सुकन्या समृध्दी योजना टपाल विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत टपाल कार्यालयात मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सुकन्या खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, वडीलांचे किंवा आईचे आधारकार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी आवश्यक आहे. आपल्या 0 ते 10 वर्ष वयापर्यंतच्या मुलींच्या नावे मुख्य टपाल कार्यालयात सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत नवीन खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चाळीसगाव मुख्य टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर यांनी केले आहे.