सुकी नदीच्या पाण्यावरून रावेर तालुक्यात शेतकरी आक्रमक

0

पावसाळ्यात पाण्याचा प्रश्‍न ; शाखा अभियंत्याची लोकप्रतिनिधींकडून कानउघाडणी

रावेर- तालुक्यातील सुकी नदीवर असलेल्या गारबर्डी (सुकी) धरणातून शेतीसाठी असलेल्या खिरोदा भागातील पाटचारीत पाणी सोडल्याच्या कारणावरून सुकी पाणी वापर संस्थेच्या सभासदांसह चिनावल पक्षहसरातील 10 गावातील शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयाी पाटचारीत सोडलेले पाणी त्वक्षहत बंद करण्याची मागणी सोमवारी तहसीलदारांना केली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता तर पाणी सोडणार्‍या शाखा अभियंत्याला चांगलेच धारेवर धरत शेतकरी व लोकप्रतिनिधींनी त्यांची तहसीलदारांसमोर चांगलीच कानउघाडणी केली. दरम्यान, पाटचारी असलेल्या खिरोदा परीसरातील शेतकर्‍यांनी लागलीच तहसीलदारांची भेट घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पाणी पाटचारीत सोडावे, अशी मागणी केली. सुकी नदीचे पाणी नैसर्गिक प्रवाहाद्वारे तापी नदीपात्रापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत पाटचारीतून पाणी सोडले जाणार नाही, असे लेखी आश्वासन लघूसिंचन विभागाचे खिरोदा येथील शाखा अभियंता महेश पाटील यांनी शेतकर्‍यांना तहसीलदारांसमोर दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत तर या वर्षीही आतापर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर स्वरूपात निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मात्र 15 ऑगष्टपासून दोन दिवस झालेल्या पावसाने सुकी नदीवरील धरण भरून ओव्हरफ्लो झाल्याने नदी दुथडी भरून वाहत असल्याने परीसरातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पाटचारीतून पाणी सोडण्याला आक्षेप
सुकी धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी असलेल्या पाटचारीतून खिरोदा व परीसरातील शेतकर्‍यांनी पाणी सोडण्याची मागणी लघूसिंचन विभागाकडे केल्याने या पाटचारीतून रविवारी पाणी सोडण्यात आले होते परंतु नदीचा नैसर्गिक प्रवाह तापी नदी पात्रापर्यंत असल्याने व नदीचे पाणी तापी नदीपर्यंत अद्याप न पोहचल्याने पाणी सोडण्याला सुकी पाणी वापर संस्थेसह चिनावल परीसरातील संजीव महाजन, पंकज नारखेडे (चिनावल), डी.के.महाजन (वाघोदा), डॉ.मनोहर पाटील (वडगाव), पंचायत समिती सदस्य दीपक पाटील (वाघाडी), सुनील कोंडे (निंभोरा), सुनील पाटील (उटखेडा) यांच्यासह चिनावल, कुंभारखेडा, वाघोदा, वडगाव, निंभोरा, दसनूर, उटखेडा यासह 10 गावातील सुमारे 300 शेतकर्‍यांनी आक्षेप घेत पाणी त्वरित बंद करण्याची मागणी तहसीलदारांना केली.

पाटचारीचे पाणी त्वरीत बंद
शेतकरी आक्रमक असल्याने हा वाद सोडवीत मार्ग काढण्याचा प्रयत्न उपस्थित पदाधिकार्‍यांनी केला. या घटनेची दखल घेत त्वरीत पाटचारीचे पाणी बंद करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती माजी सदस्य गोपाल नेमाडे, लघू सिंचन विभागाचे व्ही.बी.नेमाडे, खिरोदा शाखा अभियंता महेश पाटील उपस्थित होते.

लेखी आश्वासनानंतर माघार
जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतल्यानंतर शाखा अभियंता महेश पाटील व व्ही.बी. पाटील यांनी तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्यासमोर या शेतकर्‍यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.

खिरोदा परीसरातील शेतकर्‍यांची विनंती
काही वेळानंतर खिरोदा व परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीदार ढगे यांची भेट घेऊन पाटचारीतून पाणी सोडण्याची विनंती केली मात्र सुकी नदीचे पाणी तापी नदीपात्रापर्यंत पोहचल्यानंतर पाटचारीतून पाणी सोडण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार ढगे यांनी दिले.