सुट्यांसह लग्नसराईमुळे एसटी हाऊसफुल्ल

0

भुसावळ। लग्न समारंभासाठी जाणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याने बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे येणारी बस भरून येत असल्याने हि बस इतर थांब्यावर थांबत नाही. या परिस्थितीचा फायदा घेत अवैध वाहतूकदार सक्रिय झाले आहेत. शहरात मोठया प्रमाणात ही वाहतूक सुरू असून पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. काळी-पिवळी, मिनीडोअर, ऑटोरिक्षा, जीप यासह इतर वाहनातूनही प्रवासी वाहतूक बाराही महिने सुरू असते. मात्र सध्या या वाहतुकीला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. एकाच दिवशी अनेक लग्न येत असल्याने नागरिकांची बाहेरगावी जाण्यासाठी धडपड सुरू असते.

बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली
उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईमुळे बाहेरगावी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसते. मात्र यासोबतच बस स्थानकाशेजारी व पांडूरंग टॉकीज या ठिकाणी उभ्या राहणार्‍या अवैध प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणीही गर्दी दिसत आहे. बसमध्ये पाय ठेवायला जागाच राहत नाही. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करण्यास तयार होतात. या ठिकाणीही वाहतूकदार प्रवाशांना अक्षरश: कोंबतात. काही प्रवासी तर वाहनांच्या पायदानवर लटकताना दिसतात. वाहनांच्या छतावर आणि मागे लटकून जीव मुठीत घेऊनच प्रवास कराव लागतो.