सुधारला नाहीत तर शाळेवर मनसेचा जागता पहारा ठेवू!

0

शालिनी ठाकरे यांचा रायन इंटरनॅशनल स्कूलला इशारा

मुंबई – “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी शाळा मुख्याध्यापक व विश्वस्तांना लिहिलेलं आवाहनाचं पत्र आज आम्ही तुम्हाला देतोय. पण तरीही भविष्यात तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावलं उचलली नाहीत, तर मनसेचे पदाधिकारी तुमच्या शाळेवरच जागता पहारा ठेवतील”, अशा शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वादग्रस्त रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना इशारा दिला.

सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरुन खून करण्यात आल्याने रायन इंटरनॅशनल स्कूल सध्या देशपातळीवर चर्चेत आहे. देशभरातील सर्व रायन इंटरनॅशनल स्कूल्सचे मुख्यालय कांदिवली ठाकूर संकुलातील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज या शाळेचे वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक संतोष सावंत आणि प्रेम शेट्टी यांची भेट घेतली.

शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापकांशी झालेल्या भेटीत शालिनी ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र वाचावयास सांगितले. त्यानंतर झालेल्या चर्चेत रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरक्षाविषयक बाबींचा कसा बोजवारा उडालेला आहे, याचा पाढाच शालिनी ठाकरे यांनी वाचला. “आता यापुढे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही तर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपण्यास तुम्ही असमर्थ ठरले हेच सिद्ध होईल. खरंतर शिक्षणसंस्था म्हणून असलेली तुमची परवानगीच रद्द व्हायला हवी, मात्र हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे आम्ही तशी मागणी करत नाही आहोत”, असंही शालिनी ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

चर्चेच्या अखेरीस शाळेचे वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक संतोष सावंत यांनी “शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा तसंच इतर सर्व प्रकाराची सुरक्षाविषयक यंत्रणा यांमध्ये तत्काळ सुधारणा करु” असं आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं. यानंतर “तुम्ही जर तत्काळ सुधारणा केल्या नाहीत, तर मनसेचे स्थानिक पदाधिकारी येऊन शाळेची प्रत्यक्ष पाहणी करतील आणि आवश्यकता भासल्यास तुमच्यावर जागता पहारा ठेवतील”, असं शालिनी ठाकरे यांनी व्यवस्थापकांना सांगितलं. याप्रसंगी मनसेचे विभागअध्यक्ष हेमंतकुमार कांबळे, दिनेश साळवी, वीरेंद्र जाधव, सुशांत माळवदे, अरुण सुर्वे आणि महिला विभाग अध्यक्षा आरती पवार, दीपिका पवार, सुनीता चुरी, वनिता घाग तसंच शाखाध्यक्ष किरण जाधव, संतोष भोर आदी बैठकीला उपस्थित होते.

पोलिसांनीही केले मनसेचे कौतुक
मनसे शिष्टमंडळ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील बैठकीच्या निमित्ताने शाळेबाहेर आज पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित असलेले समतानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त सुहास वेळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी “पोलीस सुरक्षाविषयक काळजी घेण्याचा कायमच प्रयत्न करत असतात. आपण सर्वांनीच संस्थात्मक सुरक्षेचे नियम पाळायला हवेत. मनसेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हाताळून एक चांगला, स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे” अशा शब्दांत मनसेचे कौतुक केले.