पिंपरी-चिंचवड : राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या बाजूने केलेल्या कायद्याची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही, हे मोठे दुर्देव आहे. माथाडी मंडळाने सुधारीत अध्यादेशाची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अनेक सुविधा देणारा कायदा
सय्यद म्हणाले, “राज्याच्या औद्यौगिक क्षेत्रातील विविध कंपन्यात कार्यरत असणार्या माथाडी, हमाल, कष्टकरी, असंघटीत हमाल या सारख्या श्रमजिवी कामगारांच्या नोकरीचे नियमन करणे, त्यांच्या कामाच्या बाबतीत अटी, शर्ती तसेच श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणार्या वेतनाबाबत अधिक चांगल्या तरतुदी करण्यासाठी माथाडी कामगार कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. त्यासंबंधीचा सुधारीत अध्यादेश देखील काढला आहे. या कायद्यात असुरक्षित कष्टकरी माथाडी कामगारांच्या तसेच त्यांच्या मालकांच्या नोंदणी करण्याबरोबर या असुरक्षित घटकांसाठी स्वतंत्र भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बोनस, भरपगारी रजा, आरोग्य सुविधा, कामाच्या निश्चित वेळा, कामगारांना नोकरीविषयक संरक्षण अशा विविध कामगारांना सुविधा दिल्या आहेत. तसेच मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करुन आरोग्यसुविधा दिल्या जातात. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक परिसरातील माथाडी कामगारांसाठी अशा सुविधा दिल्या जात नाहीत. जीवन विमा निगम या संस्थेच्याही सुविधा मिळत नाहीत’’.
…अन्यथा कामगार कार्यालयाला घेराव
मंडळाने सुधारित अध्यादेशाची त्वरित अमंलबाजवणी करावी. त्याचबरोबर माथाडी मंडळात करोडे रुपयांचा भरणा होत असतानादेखील मंडळातील अपुर्या मनुष्यबळा अभावी हजारो कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. ते लवकरात-लवरात लवकर मार्गी, लागावेत अन्यथा आगामी काळात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामगारांसह कामगार अधिकारी बसतात त्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, ज्ञानोबा मुजुमले, नितीन धोत्रे, शाम सोळके, प्रभाकर गुरव, सतिश कंटाळे, सुनील साबळे, चंद्रकांत पिंगट, माउली वाळुंज, राजू तापकीर, भिवाजी वाटेकर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडुरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबले, संतोष जाधव, मारुती कौदरे आदी उपस्थित होते.